Crime : पत्नीची कोयत्याने वार करून हत्या; भररस्त्यावरील घटनेने बोरीमध्ये भितीचे वातावरण

Crime : पत्नीची कोयत्याने वार करून हत्या; भररस्त्यावरील घटनेने बोरीमध्ये भितीचे वातावरण

हत्येची पतीकडून कबुली, स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करून घेतले

परभणी : वारंवार सांगूनही सोबत राहायला तयार नसल्याने रागाच्या भरात पतीने शाळेत शिक्षणासाठी जात असलेल्या अल्पवयीन पत्नीवर रस्त्यावरच कोयत्याने गळ्यावर, चेहऱ्यावर सपासप वार करून हत्या केली. ही घटना जिंतूर तालुक्यातील बोरी गावात गुरुवारी (१८ जानेवारी) सकाळी साडे सातच्या सुमारास घडली. दरम्यान,आरोपी पती कोयत्यासह बोरी पोलिस ठाण्यात दाखल झाला आणि त्याने पत्नीला मारले असल्याचे कबूल करून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करून घेतले.
या बाबत माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील बोरी येथे वालूर रोडवरील संभाजीनगर येथे राहणारी जयश्री वाव्हळ या मुलीचा विवाह काही वर्षांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील रोहित गायकवाड याच्यासोबत झाला होता. रोहित गायकवाड हा छत्रपती संभाजीनगर शहरात खाजगी कंपनीत कामाला होता. तेथेच पती-पत्नी राहत होते. परंतु गेल्या काही महिन्यापासून या दोघांमध्ये वादविवाद वाढले. पत्नी जयश्री वाव्हळ शालेय शिक्षणासाठी तिच्या आई-वडिलांकडे बोरी येथे राहायला आली होती. मृत जयश्री नेहमीप्रमाणे शाळेत शिक्षणासाठी जात असताना पती रोहितने तिला बोरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे शिवशंकर कॉलनीच्या रस्त्यावर अडवले. संभाजीनगर येथे राहण्याच्या कारणावरून तसेच इतर विषयांवरून त्या दोघांमध्ये नेहमीसारखाच वाद झाला. या रागात रोहितने पत्नी जयश्रीच्या गळ्यावर व चेहऱ्यावर धारदार कोयत्याने वार केले. यात ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर रुग्णवाहिका चालक व एका पोलीस कर्मचाऱ्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु परभणी शहराकडे उपचारासाठी रुग्णालयात घेवून जात असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. घटनेची खबर मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, पोलीस जमादार काळे, तूपसुंदर घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास चालू आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी गोफणे, परभणीच्या मोबाईल फोरेन्सिकचे अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान, मृत जयश्री बोरी येथील एका शाळेत वर्ग नववीमध्ये शिक्षण घेत होती. भर रस्त्यावर तिची कोयत्याने हल्ला करून हत्या करण्यात आली. यामुळे शालेय विद्यार्थी व पालक भयभीत झाले असून बोरीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!