महासंस्कृती महोत्सव आजपासून; परभणीकरांना पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
परभणी : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवार ते रविवारी (सात ते अकरा फेब्रुवारी) परभणी येथील विष्णू जिनींग परिसरात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता उद्घाटन होणार आहे. महोत्सवामध्ये दररोज सायंकाळी सहा ते दहा या वेळेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक कलावंतांच्या दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचा मेजवानी परभणीकरांना मिळणार आहे. सर्वांसाठी प्रवेश मोफत आहे. पाचही दिवस परभणीकरांनी सहकुटुंब सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, समन्वयक नीळकंठ पाचंगे, अनुराधा ढालकरी व जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सोमवारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी महोत्सव स्थळाची पाहणी करून आढावा घेतला. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, अनुराधा ढालकारी,अश्विनी स्वामी, सोहळ्याचे समन्वयक नीळकंठ पाचंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवात सात फेब्रवारी रोजी आंतरराष्ट्रीय किर्तीचा अशोक हांडे आणि १६० प्रथितयश कलावंतांचा सहभाग असलेला कार्यक्रम ‘मराठी बाणा’ परभणीत प्रथमच सादर होत आहे. आठ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचा समृध्द वारसा अधोरेखीत करणारा कार्यक्रम ‘महाराष्ट्र दर्शन’ होणार आहे. या वेळी प्रख्यात विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे यांची मुख्य उपस्थिती असणार आहे. पहिल्या सत्रात, परभणीचे महागायक पं.यज्ञेश्वर लिंबेकर, गोंधळ महर्षी स्व.राजारामबापु कदम परिवार संच, शाहिर प्रकाश कांबळे, परभणी कोरिओग्राफर असोसिअएशनचे सदस्य, गुरुमाऊली कलामंच, परभणी यांचे सादरीकरण तर दुसऱ्या सत्रात विख्यात भारुडरत्न शेखर निरंजन भाकरे यांचे ‘भारुड रंग’ रंगणार आहे. नऊ फेब्रुवारी रोजी दुर्मिळ व लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृतीचा अनोखा अविष्कार ‘कलासंगम’ सादर होणार आहे. यावेळी प्रसिध्द अभिनेते संदिप पाठक विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. बालगंधर्व कला व क्रीडा मंच, राजीव गांधी युवा फोरम, क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्ट, प्रियभुषण डान्स अकॅडमी गंगाखेड, नागवंशी प्रतिष्ठान, मधुकर कांबळे, रामदास कदम व संच, शुभम म्हस्के, प्रीती भालेराव आदी स्थानिक कलावंत कला सादर करणार आहेत. दहा फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रात मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.गणेश चंदनशिवे हे ‘लोकरंजनातून लोकप्रबोधन’ विषयावर सादरीकरण करणार आहे. दुसऱ्या सत्रात अभिनेत्री स्मृति व ऐश्वर्या बडदे यांचा लावणीचा नृत्याविष्कार ‘लावण्यरंग’ सादर होणार आहे. अकरा फेब्रुवारी रोजी समारोप आहे. या दिवशी पहिल्या सत्रात इंडियन आयडल फेम गायक राहुल सक्सेनाच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक मान्यवर कलावंत समी सौदागर, प्रांजल बोधक, लक्ष्मी लहाने, पवन पागोटे, आयुष डान्स अकॅडमी व बाल विद्या मंदीरचे विद्यार्थी ‘स्वरजल्लोष’ कार्यक्रम सादर करणार आहेत. कवी संम्मेलनाने महोत्सवाची सांगता होणार आहे. यामध्ये प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव, प्रभाकर साळेगावकर, रविशंकर झिंगरे, रेणु पाचपोर, केशव खटिंग, संतोष नारायणकर, नारायण पुरी, बापु दासरी व मधुरा उमरीकर आदींचा सहभाग आहे. यासोबतच जिल्हा क्रीडा अधिकारी व विविध क्रीडा संस्था परभणी यांचे वतीने दररोज सायंकाळी सहा ते साडेसाह या वेळेत जिमनॅस्टिक, मल्लखांब, तलवारबाजी, योगा, कराटे, बॉक्सिंग इत्यादी साहसी खेळांचे प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.
♦विविध प्रदर्शनी
विद्यार्थांसाठी सचित्र शिवचरित्र व शिवकालीन शस्त्रास्त्रांचे, दुर्मीळ वस्तू व नाण्यांचे प्रदर्शन यासह; हस्तकला, गृहउद्योग, महिला बचतगट, पर्यटन विभाग यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. उपविभागीय परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक व परिवहन विभागातर्फे विशेष सादरीकरण केले जाईल. या महासंस्कृती महोत्सवाचे भव्य आयोजन व विद्यार्थांसाठी शिव छत्रपतींच्या जीवनमूल्यांचा, गडकिल्ल्यांचा परिचय देणारी भव्य प्रदर्शनी देखील महोत्सवातील विशेष आकर्षण ठरणार आहे.
♦मान्यवरांचा सन्मान, रसिकांना भेटवस्तू
महोत्सवामध्ये कला व साहित्याच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदानातून ज्यांनी परभणीचा लौकिक सर्वदूर वाढवला अशा मान्यवरांचा सन्मान व करण्यात येणार आहे. यामध्ये सुरमणी पं.422डॉ.कमलाकर परळीकर (संगीत), रोहित नागभिडे (संगीत), डॉ.आसाराम लोमटे (साहित्य,) यज्ञेश्वर शास्त्री लिंबेकर (गायन), किशोर पुराणिक (नाटक) यांचा समावेश आहे. महोत्सवामध्ये प्रत्येक दिवशी रसिकांना कूपन्स वितरीत करून लकीड्रॉद्वारे किमान पाच भाग्यवंताची निवड करुन, विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक भेटवस्तूने गौरविण्यात येणार आहे.