ज्ञानराधा मल्टिस्टेट विरूद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी

ज्ञानराधा मल्टिस्टेट विरूद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी

डीवायएसपींकडे सेलूतील ठेवीदारांची तक्रार, ‘राजस्थानी’च्या ठेवीदारांनी मांडले गार्‍हाणे

सेलू जि.परभणी : ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कुटे, संचालक मंडळ व अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सेलूतील ठेवीदारांनी केली आहे.
या संदर्भात मंगळवारी, १३ फेब्रुवारी रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ओव्हळ यांना तक्रारवजा निवेदन देण्यात आले. याप्रसंगी ॲड.मुकुंद गजमल, उध्दव लिपणे, जगदीश राठी, मीरा घोडके, यमुना माथेले आदींची उपस्थिती होती. ज्ञानराधा मल्टिस्टेट सोसायटीने ग्राहक, सभासद, ठेवीदारांना मुदत ठेवी, सोने तारण, दामदुप्पट रक्कम, आकर्षक व्याजदराचे आमीष दाखविले. सेलू व परिसरातील गोरगरीब नागरिक, शेतकऱ्यांच्या ५० कोटी रुपयांवर ठेवी घेऊन आर्थिक घोटाळा केला आहे. गेल्या चार पाच महिन्यांपासून ठेवीचे पैसे परत देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. अध्यक्ष सुरेश कुटे, शाखाधिकारी राजेभाऊ चाळक, रोखपाल ढोणे कोणताही प्रतिसाद देत नाहीत. उलट असभ्य भाषेत शिवीगाळ करून ठेवीदारांना धमकावले जाते, असे तक्रारीमध्ये नमूद आहे. ‘ज्ञानराधा’च्या सर्व संबंधितांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जाईल. चार-पाच दिवसात ठेवी परत देण्याबाबत निर्णय झाला नाही तर अध्यक्ष सुरेश कुटे व अन्य जणांवर गुन्हे नोंदविण्याची कारवाई केली जाईल, अशी ग्वाही उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ओव्हळ यांनी ठेवीदारांना दिली. या वेळी प्रमोद जोशी, नागेश बुरेवार, शुभम मोरे, अतुल गजमल, रामदयाल लड्डा, मधुकर आनंदे, शिवप्रसाद काबरा, हरिकिशन शर्मा आदींसह ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘राजस्थानी’च्या ठेवीदारांनी मांडले गार्‍हाणे

दरम्यान, सेलू येथील राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांनीही शाखा दीड महिन्यांपासून बंद आहे. सव्वा कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. अध्यक्ष चंदुलाल बियाणी, शाखाधिकारी नंदकिशोर सोमाणी यांच्याशी संपर्क होत नसल्याने ठेवीदार धास्तावले आहेत, अशी तोंडी तक्रार ओव्हळ यांच्याकडे केली आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!