मराठी भाषा टिकविण्याची जबाबदारी सर्वांचीच: कवी दिगंबर रोकडे
सेलूतील नूतन कन्या प्रशालेत मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम
सेलू जि.परभणी : मराठी भाषा आपली माता आहे. जागतिकीकरणाच्या युगात मातृभाषा मराठी जगली पाहिजे आणि ती टिकण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, असे मत प्रसिद्ध कवी दिगंबर रोकडे यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नूतन कन्या प्रशालेत २७ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रोकडे बोलत होते.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका उज्वला लड्डा, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, के.बा.विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
लेझीम पथकाने पाहुण्यांचे स्वागत झाले. कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी या गीताद्वारे पाहुण्यांचे स्वागत झाले. प्रास्ताविक दत्तराव घोगरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सुरेखा आगळे यांनी दिला. दिगंबर रोकडे यांनी सुमधूर आवाजात कविता सादर करून विद्यार्थिनींची मने जिंकली. पाहुण्याचा शाल ,श्रीफळ,पुष्पगुच्छ, पुष्पहार,अमृतायन गौरवग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
आठवी क च्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. भालचंद्र गांजापूरकर यांनी स्वातंत्र्यदेवतेची विनवणी आणि नटसम्राट या नाटकातील प्रसंगाचे वाचन केले.अध्यक्षीय समारोप उज्वला लड्डा यांनी केला. सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले. आभार रेणुका अंबेकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता मराठमोळ्या नृत्याने झाली. प्रशालेतील विद्यार्थिनी, शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.