महाशिवरात्री : सेलूतील शिवालये गर्दीने फुलली; जलाभिषेकासाठी भाविकांची रीघ
सेलू जि.परभणी : महाशिवरात्री निमित्त जिल्ह्यातील ठिकठिकाणची शिवालये शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेली होती. जलाभिषेकासाठी भाविकांची रीघ लागली होती. सेलू येथील श्री शंकरलिंग मंदिरात शुक्रवारी दर्शनासाठी भल्या पहाटे पासूनच भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. सकाळी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते लघुरूद्राभिषेक करण्यात आला. या वेळी माजी आमदार हरिभाऊ लहाने, अशोकअप्पा वाडकर, प्रा.मिलिंद झमकडे, शुभम महाजन, बालासाहेब सरकाळे, विश्वनाथ हुगे, शुभम सोळंके, पवन मिटकरी, महादेव आगजाळ, हरिश्चंद्रअप्पा साडेगावकर, बबनअप्पा झमकडे, रामदास पाटील, जगन्नाथअप्पा चाकोते आदींची उपस्थिती होती. जागतिक महिला दिनानिमित्त वंदना कैलास स्वामी व शिवलिला थळपती यांचा सत्कार करण्यात आला. महिला मंडळाच्या वतीने दुपारी लिंगाष्टक गायन केले. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने मंदिर परिसरात शिव परमात्म्याच्या माहिती देण्यार्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ब्रह्माकुमारी सविता बहेन, राधा बहेन, सारिका बहेन आदींसह ब्रह्माकुमारी परिवाराने या साठी पुढाकार घेतला. महाशिवरात्र महोत्सवानिमित्त उद्योजक जयप्रकाश बिहाणी यांच्यावतीने मंदिर गाभाऱ्याचे सुशोभीकरण करण्यात आले. संस्थानच्या वतीने शिवनाम सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दामिनी पथकाच्या प्रमुख अस्मिता मोरे, गृहरक्षक दलाचे दीपक चौधरी, ज्ञानेश्वर बरसाले, अर्जुन टाके, जुलेखा सौदागर, एजाज खतीब, दिनकर कटारे आदींसह स्वयंसेवकांनी शिस्त राखण्यासाठी सहकार्य केले.
महेश नगरातील साईबाबा मंदिरात श्री महेश्वर शिवलिंगाच्या जलाभिषेकासाठी भाविकांची गर्दी होती. परभणी शहरातील नांदखेडा रोडवरील श्री मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिरात महशिवरात्री उत्सव उत्साहात साजरा झाला. विशेष सजावटीसह मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. सेलू तालुक्यातील वालूर येथील श्री वाल्मिकेश्वर, हातनूर, रायपूर, निरवाडी आदी ठिकाणी दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या.