‘तिची कथा’ काळजाला भिडणारी : संध्या फुलपगार; सेलूतील ग्रंथालयात स्वामी रामानंद तीर्थ ग्रंथालयात कार्यक्रम
‘एक दिवस एक पुस्तक’ उपक्रम, वाचकांची मोठी उपस्थिती
सेलू जि.परभणी : लेखिका माधुरी साकुळकर यांनी ‘तिची कथा’ या पुस्तकात शंभर स्त्रियांचे आत्मचरित्र मांडले आहे. स्री आणि स्त्री जीवनाचे वास्तव मांडणार्या यातील कथा काळजाला भिडणार्या आहेत, असे मत कवयित्री संध्या फुलपगार यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनानिमित्त सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयातील “एक दिवस एक पुस्तक” या उपक्रमांतर्गत सोमवारी (११ मार्च) माधुरी साकुळकर लिखित ‘तिची कथा’ या पुस्तकाचे अंतरंग उलगडून सांगताना फुलपगार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सेलू महिला मंडळाच्या सहसचिव वसुधा महेश खारकर होत्या. याप्रसंगी डॉ.स्मिता देऊळगावकर यांची उपस्थिती होती.
फुलपगार म्हणाल्या की; वाचणाऱ्या बायका रडत नाहीत. लिहिणाऱ्या बायका मरत नाहीत. संस्कार, संस्कृतीच्या नावाखाली स्त्रीला पारतंत्र्यात ठेवले जातेय ? स्त्रीयांचे मने जपणारी माणसे अलिकडे कमी होत चाललीत की काय ? असा प्रश्न ‘तिची कथा’ मधून उपस्थित होतो.” डॉ.देऊळगावकर म्हणाल्या, ” महाराष्ट्राला एक सांस्कृतिक, कलेचा समृद्ध वारसा लाभला आहे. तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ” अध्यक्षीय समारोप वसुधा खारकर यांनी केला. प्रास्ताविक ग्रंथालयाचे सचिव प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन किर्ती राऊत यांनी केले. अश्विनी ढाकणे यांनी आभार मानले. सहसचिव चंद्रशेखर मुळावेकर, ग्रंथपाल महादेव आगजाळ, पंडित जगाडे, विलास शिंदे, अनिरुद्ध टाके यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महिला, नागरिक, वाचकांची मोठी उपस्थिती होती.