‘जनशताब्दी’चे सेलू स्थानकावर जोरदार स्वागत; प्रवाशी संघटनेच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती
सेलू जि.परभणी : हिंगोली-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसला सेलू येथे थांबा मिळवण्याच्या मराठवाडा प्रवाशी संघटनेचा मागणीला यश आले आहे. गुरुवारी, १४ मार्च रोजी सकाळी या गाडीचे सेलू रेल्वे स्थानकावर प्रवाशी संघटनेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. जनशताब्दी रेल्वेचे आगमन होताच रेल्वेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच रेल्वेचे चालक, गार्ड व प्रथम प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या मागणीसाठी परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव, जिंतूर – सेलू मतदार संघाच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे विशेष सहकार्य लाभल्याबद्दल संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले. खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी यासाठी आग्रही पाठपुरावा करून सेलू तालुक्यातील शहरातील प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे.
यावेळी मराठवाडा रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष शिवनारायण मालानी, कृष्णा काटे, मनीष कदम, अर्जुन बोरूळ, पापा काबरा, प्रवीण माणकेश्वर, शंभू काकडे, शेख मुनिर, भगवान पावडे, मारोतराव भिसे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, प्रवाशी उपस्थित होते.