सेलूतील बाल आरोग्य मेळाव्याला प्रतिसाद; यशवंत विद्यालय व शुभंकरोती फाऊंडेशनचा उपक्रम
सेलू जि.परभणी : सेलू येथील यशवंत विद्यालय व शुभंकरोती, देसाई फाऊंडेशनच्या वतीने सोमवारी, १८ मार्च रोजी आयोजित बाल आरोग्य मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. उद्घाटनप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मुकेशराव बोराडे, किरण चौधरी, निशिकांत पाटील, मुख्याध्यापक रामप्रसाद गोरे, रतन थटवले यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, शारीरिक, मानसिक आणि सृजनात्मक विकासासाठी फाऊंडेशन मराठवाड्यात काम करत आहे, असे चौधरी यांनी सांगितले. विविध खेळांद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारा फाऊंडेशनचा उपक्रम कृतिशील आहे, असे मुकेशराव बोराडे यांनी नमूद केले. मेळाव्यात विविध शैक्षणिक उपक्रम व खेळांची दालने उभारण्यात आली होती. पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन अनुराधा कानडे यांनी केले. विष्णू वामन यांनी आभार मानले. मेळाव्यासाठी शाळेतील शिक्षक, कर्मचारी, फाऊंडेशनचे पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले.