परभणी जिंकायचीच;पण कशी ?
नवनवीन राजकीय समीकरणे धक्कादायक निकालाची नांदी ठरण्याची शक्यता
परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, पाथरी आणि जिंतूर तर जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय (बंडू ) जाधव यांची उमेदवारी अंतिम झाल्याचे जवळपास निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवातही केली आहे. सलग दोन वेळा खासदार असलेल्या संजय जाधव यांच्यासमोर महायुतीचे आव्हान असणार आहे. महायुतीकडून गेल्या वेळी क्रमांक दोनचे मते घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) राजेश विटेकर यांना उमेदवारी मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु,ज्या परिस्थितीत विटेकर यांनी गेल्या वेळी क्रमांक दोनची मते घेतले. ती राजकीय परिस्थिती आता राहिलेली नाही. आणि ज्या परिस्थितीत संजय जाधव दुसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले तीही परिस्थिती सध्या बदललेली आहे. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून इच्छुकांची भाऊ गर्दी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सक्रिय राहिलेले डॉ.केदार खंटिंग यांना भाजपकडून नवा चेहरा बनविण्याचा प्रयत्न केला जात असतांनाच, भाजपचे लोकसभा प्रचार प्रमुख माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनीही ‘फिक्स खासदार’ म्हणून वातावरण निर्मिती करत उडी घेतली. बोर्डीकरांनी पुढाकाराने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. मात्र, महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याचे ओळखून गेल्या आठवड्यातच मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठून खलबते केली आहेत. मतदारसंघाच्या आदलाबदलीत परभणी भाजपाला सुटावी, असा प्रयत्न सुरू करून उमेदवारीसाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. शिवाय बोर्डीकरांच्या ऐनवेळीच्या खेळीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (अजित पवार) राजेश विटेकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. विटेकर यांनीही गाठीभेटीवर भर देत मोर्चेबांधणीला सुरुवात केली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनीही महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा परभणीमध्ये घडवून आणला आणि प्रचाराची ‘मशाल’ प्रज्वलित केली. विशेषत: व्यासपीठावर उपस्थित परभणी व जालना जिल्ह्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रसचे आजी-माजी आमदार, खासदार व घटक पक्षातील नेत्यांच्या गळ्यातील भगव्या रूमालांनी सर्वांचे लक्ष वेधले. जाधवांच्या विजयाचा निर्धार सर्वांनी यावेळी व्यक्त केला. याशिवाय संघटनात्मक पातळीवर नवीन चेहऱ्यांना संधी देत मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी परभणीत विजय निर्धार मेळावा घेत माढा आणि परभणी लोकसभा मतदारासंघातून लढण्याचा इरादा स्पष्ट केला. महायुती वा महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याचा प्रयत्न जानकरांकडून सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीची रणनिती अद्यापही स्पष्ट नाही. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी संपूर्ण जिल्हा ढवळून काढला आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांच्याही इकडे तिकडे उड्या सुरूच आहेत. मतदारांमध्ये कमालीची संभ्रमावस्था आहे. एकूणच राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाचे पडसाद परभणी लोकसभा मतदारसंघातही उमटणार आहेत. नवनवीन समीकरणे धक्कादायक निकालाची नांदी ठरू शकतात. महाविकास आघाडीतील घटक पक्ष भाकपने राजन क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, महायुतीचा उमेदवार कोण असेल ? वंचित बहुजन आघाडी, एमआयएम व राष्ट्रीय समाज पक्षाची नेमकी भूमिका काय राहील ? या बाबत अनिश्चितता कायम आहे. यामुळे सध्या तरी परभणी लोकसभा निवडणुकीतील लढतीचे चित्र अस्पष्ट आहे. महाविकास आघाडी असो की महायुती, लढणार्याला कोणत्याही स्थितीत परभणी जिंकायचीच आहे. पण ती कशी ? याचे डावपेच कोण कसे आखतो, हे आगामी काळात महत्वपूर्ण ठरणारे आहेत.
__________
परभणी लोकसभा २०१९ निवडणूक निकाल
उमेदवाराचे नाव : संजय (बंडू) जाधव
पक्ष : शिवसेना
प्राप्त मते : ५,३८,९४१ (४३.०२ टक्के) विजयी
उमेदवाराचे नाव : राजेश विटेकर
पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस
प्राप्त मते : ४,९६,७४२ (३९.६५ टक्के)
उमेदवाराचे नाव : आलमगीर मो.खान
पक्ष : वंचित बहुजन आघाडी
प्राप्त मते : १,४९,९४६ (११.९७ टक्के)
अन्य उमेदवार प्राप्त मते : ५.३६ टक्के
_______