जिंतूरच्या भानुदासची इस्रोच्या तांत्रिक सहाय्यकपदी निवड
पांढरगळा शाळेच्या वतीने सत्कार; मान्यवरांची उपस्थिती
परभणी : जगण्याचा संघर्ष असणारी अनेक लोकं समाजात वावरत असतात. मात्र, या संघर्षातून देखील यशाच्या वाटा चोखंदळत नवे परिमाण स्थापित करण्याची जिद्द काही लोकांमध्ये असते. अशाच एका जिद्दीची ही कहाणी म्हणजे भानुदास कवडे. गाव पांढरगळा ता. जिंतूर येथील हा विद्यार्थी इस्रो येथे तांत्रिक सहाय्य ग्रेड-२ या पदी त्याची नुकतीच निवड झाली आहे. भानुदासचा जन्म जिंतूर तालुक्यातील पांढरगळा या गावी झाला. आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरगळा येथेच पूर्ण करुन माध्यमिक शिक्षण संत तुकाराम विद्यालय जोगवाडा येथे पूर्ण केले. पुढे तंत्रनिकेतन पदविका अपूर्वा तंत्रनिकेतन सेलू, अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी एमजीएम जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, पदव्युत्तर शिक्षण एमटेक डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे पूर्ण करुन जगण्याची धडपड त्यांनी सुरूच ठेवली.
भानुदासची घरची परिस्थिती तशी बेताचीच. आई-बाबा शेतकरी. शिक्षणासाठी लागणारा खर्च आपल्या कोरडवाहू शेतीवरच भागवला. भानुदासच्या यशाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरगळा मुख्याध्यापक बिभीशन राठोड यांनी सुद्धा शाळेच्या वतीने सत्कार केला. परभणी अस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक, शिक्षणाधिकारी संजय ससाणे, माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी भानुदास यांचे अभिनंदन केले. डॉ.पी.आर.पाटील , डॉ.जगदीश नाईक, मुख्याध्यापक नितीन लोहट, डॉ.रणजीत लाड, बालाजी कोंड्रे, डॉ.निंबाळकर , अशोक लाड, प्रसाद वाघमारे, ज्ञानेश्वर कवडे, बाळू बुधवंत यांची उपस्थिती होती.
इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून काम करायचेय
जगण्याची भ्रांत असताना हातात एक शाश्वत पर्याय असावा म्हणून या मिळालेल्या संधीकडे मी पाहतो आहे. भविष्यामध्ये इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून काम करण्याची संधी मला मिळेल. यासाठी मी प्रयत्न करणार, तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी परीक्षाद्वारे मला यशस्वी व्हावयाचे आहे. – इंजि.भानुदास राजामती बाबासाहेब कवडे, इस्रो तांत्रिक सहाय्यक