परभणी लोकसभा : विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक रिंगणात : महादेव जानकर
महायुतीच्या परभणीतील पत्रकार परिषदेत जानकर यांनी मांडली भूमिका
परभणी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील परभणी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आपल्याला दिली आहे. या संधीचे सोने करून परभणी जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्यावर निवडणूक रिंगणात उतरलो आहे, अशी माहिती महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी रविवारी, ३१ मार्च रोजी दिली.
परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोमवारी, १ एप्रिल रोजी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जानकर यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, शिवसेना लोकसभा समन्वयक माजी आमदार हरिभाऊ लहाने, माजी आमदार मोहन फड, भाजपचे आनंद भरोसे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, प्रताप देशमुख, काशिनाथ शेवटे, राजेश देशमुख, गफार मास्टर, प्रवीण देशमुख, संतोष देशमुख, सुरेश भुमरे, रिपाईचे दाभाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. श्री.जानकर म्हणाले की, मी महाराष्ट्राचा रहिवासी असून, राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून गेल्या ४० वर्षापासून काम करीत आहे. लोकवर्गणीतून जनतेची सेवा करीत आहे. परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मला दत्तक घेतले आहे. त्यामुळे माझ्याकडे उपरा म्हणून कुणी बहकवण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्याकडे लक्ष देवू नये. परभणीत एकही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नाही, समृध्दी महामार्ग परभणी जिल्ह्यातून जात नाही, असे अनेक विकासाचे प्रश्न आहे. ते सोडविण्यासाठी आणि जिंकण्यासाठी ही निवडणूक लढवत आहोत. त्यासाठी सर्वांचा आधार, आशीर्वाद मिळावा, असे आवाहन जानकर यांनी केले. बारामती, रायबरेली, गांधीनगर, वाराणसी लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत शरद पवार, सोनिया गांधी, नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासाच्या धर्तीवर परभणीचा विकास करणार, असल्याचे जानकर म्हणाले. राजेश विटेकर म्हणाले, ” आपण गेल्या पाच महिन्यापासून संभाव्य उमेदवार म्हणून निवडणुकीची तयारी करीत होतो, मात्र पक्षाच्या आदेशानुसार आता जानकर यांचे एकदिलाने काम करणार आहोत.”