परभणी लोकसभा : ६१ उमेदवारांना ८७ नामनिर्देशन अर्जाचे वितरण; ३ उमेदवारांचे ९ अर्ज सोमवारी दाखल
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांची माहिती
परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी सोमवारी (एक एप्रिल) तीन उमेदवारांनी नऊ नामनिर्देशन अर्ज दाखल केले असून आतापर्यंत एकूण ६१ इच्छुक उमेदवारांना ८७ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले आहे. परभणी लोकसभा मतदार संघाचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ही माहिती दिली. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दत्तु शेवाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
परभणी लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला २८ मार्चपासून सुरुवात झाली आहे. सोमवारी, एक एप्रिल रोजी अपक्ष उमेदवार गोविंद रामराव देशमुख यांनी चार, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जगन्नाथ जानकर यांनी तीन आणि अपक्ष उमेदवार आप्पासाहेब ओंकार कदम यांनी दोन नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी (३० मार्च) दोन अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी १८ उमेदवारांना ३० नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. एकूण ६१ इच्छुक उमेदवारांना ८७ नामनिर्देशन पत्रांचे वितरण झाले आहे. उमेदवारांना गुरुवारपर्यंत (४ एप्रिल) कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहेत. शुक्रवारी, ५ एप्रिलरोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून, सोमवारी, ८ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत, असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले.