परभणी लोकसभा : जानकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा : उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे महायुतीच्या कार्यकर्त्यांना आवाहन
परभणीत जाहीर सभा : उपमुख्यमंत्री अजित पवार, पंकजा मुंडे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती
♦विरोधकांकडून जनतेची दिशाभूल : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बदलणे कोणालाही शक्य नाही. विरोधी पक्षांकडे कुठलाही मुद्दा नसल्याने निवडणुकीच्या तोंडावर जनतेची दिशाभूल करून अपप्रचार केला जात आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
परभणी : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या रूपाने वंचित व बहुजनांसाठी अहोरात्र झटणाऱ्या एका साध्या, सरळ, उच्चशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला परभणीचा खासदार म्हणून निवडून देण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जानकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. स्वतःच उमेदवार समजून ही निवडणूक लढवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने महादेव जानकर यांनी सोमवारी, एक एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने आयोजित जाहीर सभेत फडणवीस बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, सदाभाऊ खोत, अर्जून खोतकर, राजेश विटेकर, राहुल लोणीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जानकरांना म्हणजेच नरेंद्र मोदींना मत. कर्जरूपाने तुमच्याकडे मागितलेले हे मत येत्या पाच वर्षात विकासाच्या व्याजासह जानकर तुम्हाला परत करतील, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी दिला. शक्तीपीठ मार्ग परभणी जिल्ह्यातून चालला आहे. त्यामुळे येत्या काळात पर्यटन, कृषी समृध्दी व उद्योग विकासाची नवीन संधी परभणीला मिळणार आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
परभणीच्या जुन्या खासदाराने दहा वर्षात काय केले ? शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा निर्णयही महायुती सरकारनेच घेतलेला आहे. रस्ते व बाकीचे प्रश्न कायम असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केला. परभणीतून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी राजेश विटेकर, आमदार लोणीकर, रामप्रसाद बोर्डीकर ही मंडळी इच्छुक होती. मात्र; निर्णय वरिष्ठ पातळीवर झालेला असून, येत्या सहा महिन्यात विटेकरांना विधिमंडळ सदस्य करू, अशी ग्वाही पवार यांनी दिली. या वेळी पंकजा मुंडे, आमदार लोणीकर, बोर्डीकर, विटेकर आदींनी जानकरांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. माजी खासदार अॅड.सुरेश जाधव, माजी आमदार मोहन फड,अरविंद चव्हाण, विलास खरात, रामराव वडकुते, विजय वरपुडकर, संतोष मुरकुटे, व्यंकट शिंदे, प्रताप देशमुख, आनंद भरोसे, प्रवीण देशमुख, काशिनाथ शेवते, रिपाईचे डी.एन.दाभाडे यांच्यासह भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.