परभणी लोकसभा : भाकप उमेदवार कॉम्रेड क्षीरसागर यांची अनामत भरण्यासाठी केली लोकवर्गणी
सेलू तालुक्यातील डिग्रस जहांगीर येथील शेतकरी कार्यकर्त्यांचा पुढाकार
इलेक्ट्रोल बाॅन्ड घोटाळ्यात सत्ताधारी भाजपचे हप्ता वसुली धोरण उघडकीस येत आहे. अन्य प्रस्थापित पक्षदेखील या कार्पोरेट दलालीमध्ये बरबटलेले आहेत. मात्र, इलेक्ट्रोल बाॅन्डचा एक पैसाही भाकपने स्वीकारलेला नाही. डिग्रस येथील सर्व जाती धर्मातील व्यक्तींनी लोकवर्गणी जमा करून हातभार लावला आहे. जनतेने दिलेल्या निधीतून निवडणूक लढविण्यामध्ये वेगळाच आनंद आहे. – कॉम्रेड राजन क्षीरसागर, उमेदवार, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, परभणी
परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड राजन क्षीरसागर यांची अनामत रक्कम भरण्यासाठी एक एप्रिलरोजी सेलू तालुक्यातील डिग्रस (जहांगीर) येथील भाकप कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी गावांमध्ये फेरी काढून वर्गणी गोळा केली. लोकवर्गणीतून जमा झालेले रोख २४ हजार ४० रुपये क्षीरसागर यांना आमंत्रित करून सुपूर्द करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उभारण्यात आलेल्या आंदोलनामध्ये डिग्रस येथील कार्यकर्ते व शेतकरी हिरीरीने सहभागी होतात. परभणी लोकसभा मतदारसंघातून काॅम्रेड क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनामत रक्कम भरण्यासाठी गावामधून सोमवारी फेरी काढण्यात आली. समारोपप्रसंगी उमेदवार क्षीरसागर, कॉम्रेड अब्दुलभाई, कॉम्रेड बाबूभाई, मुंजाभाऊ लिपणे, गुलाब पौळ, बालाजी पौळ, नारायण पौळ, भोलेनाथ पौळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. क्षीरसागर यांनी मंगळवारी, दोन एप्रिल रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने रॅली काढण्यात आली होती. भाकप नेते भालचंद्र कांगो, ॲड.अभय टाकसाळ, प्रकाश रेड्डी, राजू देसले, ॲड.माधुरी क्षीरसागर, दिलीप लांडे, लक्ष्मण काळे आदींसह शेतकरी, शेतमजूर, कार्यकर्ते सहभागी झाले होते.