परभणी लोकसभा : १९ उमेदवारांचे अर्ज दाखल; ९८ उमेदवारांना १३० अर्जाचे वितरण
परभणी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने १७-परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी बुधवारी, तीन एप्रिलरोजी ११ उमेदवारांनी १२ नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. बुधवारपर्यंत एकूण १९ उमेदवारांचे ३० नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी ही माहिती दिली. बुधवारी १३ उमेदवारांना १६, तर आतापर्यंत एकूण ९८ इच्छुक उमेदवारांना १३० नामनिर्देशन अर्जाचे वितरण करण्यात आले आहेत. तीन एप्रिलरोजी सखाराम ग्यानबा बोबडे (अपक्ष), विजय अण्णासाहेब ठोंबरे (अपक्ष), विष्णुदास शिवाजी भोसले (अपक्ष), विनोद छगनराव अंभोरे (बहुजन मुक्ति पार्टी), किशोर राधाकिशन ढगे (स्वाभिमानी पक्ष), गणपत देवराव भिसे (अपक्ष), शेख सलीम शेख इब्राहीम (ऑल इंडिया मजलीस-ए-इन्कीलाब-ए-मिल्लत), संगीता व्यंकटराव गिरी (स्वराज्य शक्ती सेना), विठ्ठल भुजंगराव तळेकर (अपक्ष), शिवाजी देवजी
कांबळे (अपक्ष) यांनी प्रत्येकी एक नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे. तर कृष्णा त्रिंबकराव पवार यांनी (न्यू राष्ट्रीय समाज पार्टी) आणि (अपक्ष) याप्रमाणे दोन नामनिर्देशन अर्ज दाखल केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी गावडे यांनी दिली. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दत्तु शेवाळे यांनी उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करुन घेतले. उमेदवारांना गुरुवार, ४ एप्रिलपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते ३ यावेळेत नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहे. शुक्रवार, ५ एप्रिलरोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून, सोमवार, ८ एप्रिलपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहे. शुक्रवार, २६ एप्रिलरोजी १७-परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.