सेलू बाजार समितीची कापूस खरेदी सुरू; ७ हजार ९८० रुपयांचा मिळाला भाव
परभणी : कापूस खरेदीदार व्यापऱ्यांनी पुकारलेल्या बहिष्कारामुळे गेल्या २२ दिवसांपासून सेलू बाजार समितीचे बीट बंद होते. मंगळवारी आमदार मेघना बोर्डीकर यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर व्यापाऱ्यांनी बहिष्कार मागे घेतला आहे. तीन एप्रिलपासून कापूस खरेदी बीट पूर्ववत सुरू झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. संचालकांनी केलेल्या मागणीनुसार आमदार बोर्डीकर यांनी पुढाकार घेऊन व्यापाऱ्यांची बैठक घेतली. सन्मानजनक पर्याय काढला. या वेळी डॉ.संजय रोडगे, माऊली ताठे, अनिल पवार, रामेश्वर राठी, शैलेश तोष्णीवाल, प्रभूदयाल मंत्री, सुरेंद्र तोष्णीवाल, निर्मलभाई, आशिष बिनायके, अविनाश बिहाणी, ब्रिजगोपाल काबरा, सहायक निबंधक तायडे, सचिव राजीव वाघ आदींसह संचालक व व्यापारी उपस्थित होते. दरम्यान, बुधवारी लिलावाद्वारे कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ९८० रुपये, तर सर्वाधिक ८ हजार १० रुपये भाव मिळाला, अशी माहिती सचिव राजीव वाघ यांनी दिली.