सेलूमध्ये बुधवारपासून श्रीसाई महोत्सव  

सेलूमध्ये बुधवारपासून श्रीसाई महोत्सव  

भागवत कथा, कीर्तनांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम 

सेलू जि.परभणी : गुढीपाडवा व श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सेलू (जि.परभणी) शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांचे शिष्य श्रीसाईबाबा यांच्या महेशनगरातील मंदिरात बुधवारपासून (१० एप्रिल) श्रीसाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारपर्यंत (१७ एप्रिल) चालणार्‍या या महोत्सवात संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, कीर्तन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. बुधवारपासून दुपारी एक ते पाच या वेळेत श्रीमद् भागवत कथा आहे. भागवताचार्य नंदकिशोर पुराणिक गोंदीकर महाराज निरूपण करणार आहेत. दररोज सायंकाळी सात वाजता कीर्तन आहे. बुधवारी विनोदाचार्य पांडुरंग महाराज उगले, गुरुवारी जलाल महाराज सय्यद शुक्रवारी नेहाताई भोसले, शनिवारी प्रसाद महाराज काष्टे, रविवारी विनोदाचार्य नामदेव महाराज फपाळ, सोमवारी संस्कार महाराज खंडागळे यांचे कीर्तन आहे. मंगळवारी जोशी परिवार, सेलू प्रस्तुत ‘अमृतायण’ हा भावभक्ती गीतांचा कार्यक्रम, तर बुधवारी (१७ एप्रिल) सकाळी दहा वाजता शिवाजी महाराज खवणे यांचे काल्याचे कीर्तन आहे. श्रीराम जन्मोत्सवानंतर दुपारी महाप्रसाद (नगरभोजन) होणार आहे. महोत्सवातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

♦भागवत कथेमध्ये जोडप्याचा विवाह 

मंगळवारी, ९ एप्रिलरोजी गुढीपाडव्यानिमित्त सकाळी दहा वाजता महिलांसाठी ‘सुंदर माझी गुढी स्पर्धा’ आहे. गुरूवारी, १७ एप्रिलरोजी श्रीरामनवमीनिमित्त सायंकाळी सात वाजता श्रीराम व साईबाबांची महाआरती होईल. श्रीमद् भागवत कथेतील श्रीकृष्ण-रुक्मीणी विवाहप्रसंगी १५ एप्रिलरोजी चि.अजय व चि.सौ.कां.पूनम या जोडप्याचा विवाह श्रीसाईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. याद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न संस्थान करीत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!