शेकडो कर्मचाऱ्यांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क; निवडणूक प्रशिक्षणस्थळी मतदार सुलभता केंद्रांची स्थापना

परभणी : १७ -परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी परभणी लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होत आहे. त्याआधी निवडणूक कर्तव्यावरील मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण मंगळवारी, १६ एप्रिल रोजी पार पडले. या दिवशी मतदार सुलभता केंद्रांवर बहुतांश निवडणूक कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यातील जिंतूर, पाथरी आणि परभणी येथे दुसरे निवडणूक प्रशिक्षण दोन सत्रात पार पडले. प्रशिक्षणस्थळाजवळ स्वतंत्र टपाली मतदान सहायता केंद्रावर विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. या ठिकाणी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान केले. तिसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळीसुद्धा निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. परभणी विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिसरात महाविद्यालयातील सभागृहात झाले. एकूण १ हजार ५५० मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दत्तु शेवाळे, तहसीलदार डॉ.संदीप राजापुरे यांनी मार्गदर्शन केले. नायब तहसीलदार गणेश चव्हाण, अनिता वडवळकर, लक्षीकांत खळीवर उपस्थिती होते प्रशिक्षणासोबतच ईव्हिएम मशीन हाताळणीचे प्रत्यक्षात प्रात्यक्षिक करुन त्याबाबतच्या शंकाचे निरसन करण्यात आले. जिंतूर येथे दोन सत्रात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सहायक निवडणूक अधिकारी संगीता सानप, दिनेश झांपले, राजेश सरवदे, सुग्रीव मुंडे, कच्छवे आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, ९७ – गंगाखेड विधानसभा मतदार संघातील ४३२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार असून या करीता नियुक्त सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण १७ एप्रिल रोजी संत जनाबाई महाविद्यालय, कोद्री रोड, गंगाखेड या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.