परभणी लोकसभा : पंतप्रधान मोदी, ठाकरे, आंबेडकर यांच्या प्रचार सभा
परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. प्रचारासाठी केवळ सात-आठ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महायुती, महाविकास आघाडीसह वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार प्रचार केला जाणार आहे. या अनुषंगाने परभणी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ २० एप्रिल रोजी पाथरी रोडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. रामनवमीनिमित्त महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या हस्ते मोदींच्या सभा मंडपाचे भूमिपूजन संपन्न झाले. याप्रंसगी आमदार मेघना बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, राजेश विटेकर, संजय खेडेकर, राजेश देशमुख, संतोष मुरकुटे, बाबासाहेब जामगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित रहावे यासाठी महायुतीच्या वतीने जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ २३ एप्रिल रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. तर २० एप्रिल रोजी आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत. यादृष्टीनेही जोरदार तयारी सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाब डख यांच्या प्रचारार्थ १९ एप्रिल रोजी प्रकाश आंबेडकर यांची परभणीत जाहीर सभा होणार आहे.