परभणी लोकसभा : पंतप्रधान मोदींची परभणीमध्ये प्रचारसभा; महायुतीकडून शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी
परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय जनता पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ शनिवारी (२० एप्रिल) प्रचारसभा होत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच परभणीत येत असल्याने, ते नेमके काय बोलतात, हे ऐकण्यासाठी आणि त्यांना जवळून पाहण्यासाठीही सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ही सभा सर्वांर्थाने ऐतिहासिक व्हावी, या दृष्टीने महायुतीतील घटक पक्षांसह भारतीय जनता पक्षाच्या वतीने सभेची सर्वोतोपरी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेद्वारे महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसह (अजित पवार गट) अन्य घटक पक्षांच्या नेतेमंडळींनी मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी केली आहे. सभेकरीता शहरांसह ग्रामीण भागातील जास्तीत जास्त नागरीकांनी यावे या दृष्टीने हजारो वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सभेच्या पूर्वतयारीसाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेतेमंडळींनी पूर्णतःलक्ष केंद्रीत केले आहे. विशेषतः केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, प्रदेश सरटिणीस संजय केनेकर परभणीतच मुक्कामी आहेत. प्रमुख म्हणून आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी हे नांदेडमार्गे दुपारी बारा वाजता हेलिकॉप्टरने परभणीत दाखल होणार आहेत. हेलिपॅडवरुन लगेचच ते सभास्थानी दाखल होणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आदींचीही यावेळी उपस्थिती राहणार आहे.