परभणी शहर, लक्ष्मीनगरीमध्ये ड्रोनसाठी रविवारपर्यंत ‘नो फ्लाय झोन’
प्रतिनिधी, परभणी : देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी हे शनिवारी (दि.२०) परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री. महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेसाठी शहरात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने परभणी शहर व लक्ष्मीनगरी ड्रोनसाठी रविवार (दि.२१)पर्यंत ‘नो फ्लाय झोन’ घोषित केला आहे.
शनिवारी (दि.२०) अतिमहत्वाची व्यक्ती असलेले भारताचे पंतप्रधान श्री.मोदी यांचा परभणी दौरा असुन ते लक्ष्मी नगरी जिंतुर रोड परभणी येथे उपस्थित राहुन सभेला संबोधन करणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी शहर व लक्ष्मी नगरी व लगतचा परिसर हा ड्रोन करिता नो फ्लॉय झोन घोषीत केला आहे.
त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने दि.१७ ते दि.२१ एप्रिल रोजी दरम्यान हेलीपॅड परिसर सभेच्या ठिकाणी लक्ष्मी नगरी जिंतुर रोड परभणी येथे व परभणी शहरामध्ये कोणीही ड्रोन आकाशामध्ये उडवणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकारी गावडे यांनी आदेशित केले आहे.