भगवान महावीर जयंती : सेलूमध्ये पालखी मिरवणूक उत्साहात
सेलूतील जैन मंदिरामध्ये विविध कार्यक्रम
सेलू जि.परभणी : जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६२२ व्या जयंतीनिमित्त रविवारी, २१ एप्रिल रोजी सेलू शहरात विविध कार्यक्रमांसह पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. यानिमित्ताने सेलू शहरातील जैन मंदिरापासून सकाळी आठ वाजता भव्य शोभायात्रा व भगवान महावीरांच्या प्रतिमेची पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. सेलू शहरातील जैन मंदिरापासून सकाळी आठच्या सुमारास शोभायात्रा निघाली.
शहरातील विविध भागातील प्रमुख रस्त्यांवर पालखी मिरवणुकीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. ढोल, ताशांच्या गजराने व भगवान महावीरांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. महावीर जयंतीनिमित्त गेल्या चार दिवसांपासून जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भगवान महावीरांचा जलाभिषेकांसह, स्वाध्याय, ध्वजारोहण, अभिषेकपूजन, विविध धार्मिक विधी उत्सव, भजनसंध्या, विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. भगवान महावीरांनी विश्वातील संपूर्ण मानवजातीला प्रमुख पाच तत्वांद्वारे महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. सत्य, अहिंसा, अपरिग्रह, अस्तेय आणि ब्रह्मचर्य ही जैन धर्माची पाच मुख्य तत्त्वे सांगितली आहेत. प्रत्येक व्यक्तीने या पाच तत्त्वांचे पालन करून जीवनाचा खरा उद्देश साध्य केला पाहिजे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. चिमुकल्यांसह, महिला, तरूण आणि सकल जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.