लोकशाही उत्सव पर्व : नववधुवरांनी लग्नमंडपातच घातला मतदानाचा जागर
वर्हाड्यांना दिली मतदानाची शपथ
परभणी : लोकशाही निवडणूक पर्वाच्या निमित्ताने सेलू तालुक्यातील केमापूर येथे रविवारी, २१ एप्रिल रोजी आयोजित एका विवाह सोहळ्यात नववधुवरांनी मतदान जागृती निमित्ताने स्वाक्षरी मोहीमेची सुरुवात केली. तसेच उपस्थितीत वर्हाडीमंडळींना शपथ देत लग्नमंडपातच मतदानाचा जागर घातला. केमापूर येथे रविवारी पूजा व नरेश यांचा विवाहसोहळा पार पडला. मतदार जागृती फलकावर स्वाक्षरी करून वधुवर बोहल्यावर चढले. उपस्थितांना निर्भयपणे मतदान करण्याची शपथ दिली.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने वधुवरांसह उपस्थित वऱ्हाडी मंडळीकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदान करण्याचे संकल्प पत्र भरून घेण्यात आले. याप्रसंगी दगडोबा माघाडे, ज्ञानेश्वर इघारे, दत्ता शिंदे, राजेभाऊ थोरात, बीएलओ विकास पद्मावत, अंगणवाडी कर्मचारी कल्पना पालवे, आशा कार्यकर्ती रेखा बुधवंत, पोलिस पाटील संतोष आंधळे, पर्यवेक्षक शरद ठाकर यांच्यासह केमापूर, पिंपळगाव गोसावी, वाई, बोथ, सिंगठाळा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.