लोकसभा निवडणूक : २१ लाखांवर बनावट, विदेशी मद्यसाठा जप्त; परभणीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
परभणी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर परभणी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने मार्च ते १९ एप्रिलपर्यंत केलेल्या कारवाईत २१ लाख ७५ हजार ६८० रूपये किंमतीचा बनावट, विदेशी मद्यसाठा मुद्देमालासह जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कालावधीत एकूण ११२ गुन्हे उघडकीस आणले असून, यात एकूण ११३ आरोपी विरुध्द कार्यवाही केली आहे. या गुन्ह्यात एकूण २२१ लिटर हातभट्टी गावठी दारु, १६५० लिटर गावठी दारुचे रसायन, ५० लिटर ताडी, ६८० लिटर देशी दारु, ८८ लिटर विदेशी दारु, २१२ लिटर परराज्यातील विदेशी मद्य, तसेच बनावट लेबलच्या १२६० दारूसह २ चारचाकी वाहन तसेच ७ दुचाकी वाहने असा एकूण २१ लाख ७५ हजार ६८० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सराईत गुन्हेगारांविरुध्द ९ प्रकरणात प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक प्रकरणात ९ आरोपींविरुध्द प्रत्येकी एक लाख रुपयाचे बंधपत्र घेण्यात आले आहेत. तसेच एका सराईत गुन्हेगार विरुध्द एमपीडीए कायद्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या स्थानबध्दतेच्या आदेशानुसार आरोपीस छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे दाखल करण्यात आले आहे. कारवाईत सराईत गुन्हेगाराना फौजदारी प्रक्रीया संहीता कलम १४९ प्रमाणे एकूण ४२ नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. आंतरराज्य मद्य तस्करांना उपविभागीय दंडाधिकारी यांच्यामार्फत १०७ प्रमाणे एकूण ७ सराईत गुन्हेगारांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण ७ ठोक विक्री देशी दारु अनुज्ञप्तीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामार्फत नजर ठेवली जात आहे. तसेच किरकोळ विक्री अनुज्ञप्तीच्या दैनंदिन मद्य विक्रीवर देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत. परभणी लोकसभा मतदार संघासाठी शुक्रवारी, २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती बुधवार, २४ एप्रिल सायंकाळी ६ वाजेपासून २६ एप्रिल रोजी पूर्ण दिवस असे एकूण तीन दिवस तसेच मंगळवार ४ जून रोजी मतमोजणीचा दिवस कोरडा दिवस घोषीत करण्यात आला आहे. कोणीही अवैध मद्य खरेदी करु नये, तसेच जिल्हयात अवैध मद्य, बनावट व परराज्यातील विदेशी मद्य कोणी बाळगून असेल किंवा विक्री करीत असेल तर याची माहिती टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व व्हॉटस अप क्रमांक ८४२२००११३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी केले आहे.