परभणी लोकसभा : उध्दव ठाकरेंची आज परभणीमध्ये सभा
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ सभा
परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार तथा खासदार संजय (बंडू) जाधव यांच्या निवडणूक प्रचारार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मंगळवारी (२३ एप्रिल ) परभणीत विजय निर्धार सभा होत आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता स्टेडिअम मैदानावर ही सभा आहे.
आजवरच्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक रणधुमाळीच्या अंतीम टप्प्यात परभणीमध्ये ठाकरे कुटुंबियांची जाहीर सभा होत आलेली आहे. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरेदेखील प्रत्येक निवडणुकीत मतदानाच्या दोन दिवस आधी परभणीतील स्टेडिअम मैदानावरच आवर्जून जंगी सभा घेत असत. उध्दव ठाकरे यांनीसुध्दा सभेची ही परंपरा कायम राखली. यावेळी लोकसभा निवडणुकीत बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांची सभा होत आहे. सभेस अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहावे, यासाठी उमेदवार जाधव यांच्यासह महाविकास आघाडीतील नेतेमंडळींनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सभेला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते मिलींद नार्वेकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदींसह नेत्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, असे जिल्हा बँकेचे संचालक अतुल सरोदे यांनी सांगितले.
दरम्यान, महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य सभा झाली. त्यापाठोपाठ महाविकास आघाडीचे उमेदवार जाधव यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची विजय निर्धार सभा होत आहे. सभेत ठाकरे काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.