श्रीपरशुराम जन्मोत्सव उत्साहात; पालखी मिरवणूक, सजीव देखाव्यांनी वेधले सेलूकरांचे लक्ष

श्रीपरशुराम जन्मोत्सव उत्साहात; पालखी मिरवणूक, सजीव देखाव्यांनी वेधले सेलूकरांचे लक्ष

सेलू जि.परभणी : भगवान श्री परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त सेलू् शहरात शुक्रवारी, १० मे रोजी सायंकाळी श्री परशुरामांच्या भव्य प्रतिमेसह पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली.
सेलू येथील श्री परशुराम जन्मोत्सव समिती, सर्वशाखीय व बहुभाषिक ब्राह्मण समाज बांधवांच्या वतीने भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जन्मोत्सवानिमित्त श्रीगायत्री माता मंदिरात सकाळी सात वाजता भगवान श्री परशुराम यांच्या मूर्तीला महाअभिषेक करण्यात आला. सायंकाळी सहा वाजता श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून ढोल व ताशांच्या गजरात शोभायात्रा व पालखी मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली. मंदिर संस्थानचे विश्वस्त वामनराव मंडलिक व सुधीर मंडलिक यांच्या हस्ते भगवान श्री परशुराम यांच्या मूर्तीचे तसेच पालखीचे पूजन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक निघाली. अग्रभागी भगवे फेटे बांधून महिला, युवती महिला भजनी मंडळ सहभागी झाले होते. पुरुष व तरुणांनी भगवे रूमाल परिधान केले होते.मिरवणुकीतील भगवान श्री परशुराम यांची भव्य मूर्ती, परशुअस्त्र, भगवान श्री परशुराम, बाजीराव पेशवे व काशीबाई यांच्या सजीव देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरात महाआरती झाली. मिरवणुकीमध्ये विविध पक्ष, संघटना, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांच्या पदाधिकार्‍यांसह ब्राह्मण समाज बांधव महिला, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!