परभणी लोकसभा : खासदार संजय जाधवांची दणदणीत हॅट्ट्रिक; १ लाख ३४ हजारांवर मताधिक्य
रासपचे महादेव जानकर यांचा मोठा पराभव, ‘वंचित’चे पंजाब डखांना ९५ हजार ९६७ मते
बाबासाहेब हेलसकर
परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय (बंडू) हरिभाऊ जाधव यांनी खासदारकीची मोठ्या १ लाख ३४ हजार ६१ एवढ्या मोठ्या मताधिक्याने हॅट्ट्रिक साधली आहे. महायुतीचे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा धक्कादायकरित्या मोठा पराभव करीत जाधव यांनी विजय नोंदविला आहे. जाधव यांना ६ लाख १ हजार ३४३ मते मिळाली, तर जानकर यांना ४ लाख ६७ हजार २८२ मतांवर समाधान मानावे लागले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तथा हवामान अभ्यासक पंजाब डख हे ९५ हजार ९६७ घेत तिसऱ्यास्थानी राहिले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवारी, चार जून रोजी मतमोजणी झाली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, निरीक्षक कृष्ण कुमार निराला, एन.मैनूद्दीन,अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जनार्दन विधाते, संतोषी देवकुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पक्ष व अपक्षांसह एकूण ३४ उमेदवार रिंगणात होते. एकूण २१ लाख २३ हजार ५६ मतदरांपैकी १३ लाख २७ हजार ७९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खासदार संजय जाधव आणि महादेव जानकर यांच्यामध्ये थेट लढत झाली. प्रारंभीच्या टपाली मतमोजणीसह ईव्हीएम मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून खासदार जाधव यांनी आघाडी कायम राखली, तर जानकर सातत्याने पिछाडीवर होते. अंतिम फेरीअखेर जाधव यांनी मोठ्या मताधिक्याने ऐतिहासिक विजयी नोंदविला.
♦परभणी लोकसभा – अंतिम अधिकृत आकडेवारी
संजय (बंडू)जाधव, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे – ६,०१,३४३ मते (विजयी) मताधिक्य – १,३४,०६१,
महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्ष – ४,६७,२८२ मते
पंजाब डख, वंचित बहुजन आघाडी- ९५,९६७ मते.
अन्य पक्ष व अपक्ष उमेदवारांना मिळालेली मते अशी : आलमगीर मोहम्मद खान (बहुजन समाज पार्टी )-११,०६२, कैलास पवार (बळीराजा पार्टी)-९,५२०, डॉ.गोवर्धन खंडागळे (बहुजन भारत पार्टी)- १५,३९५, दशरथ राठोड (महाराष्ट्र विकास आघाडी)-४,३९४, राजन क्षीरसागर (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया)-६,६४९, विनोद अंभुरे (बहुजन मुक्ती पार्टी)-२,०४१, श्रीराम जाधव (जय सेवालाल बहुजन विकास पार्टी)-३,६२८, शेख सलिम शेख इब्राहिम (ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कीलाब-ए-मिल्लत)-२,६१९, सयद इरशाद अली (सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया)-४,६४४, संगीता गिरी (स्वराज्य शक्ती सेना).-२,३३९, अपक्ष उमेदवार : अनिल मुदगलकर-३,५३३, अर्जुन भिसे-६,९२३, आप्पासाहेब कदम-३,८९१, कारभारी मिठे-४,२७६, कांबळे शिवाजी-११,०६०, किशोर ढगे-५,४८०, किशोरकुमार शिंदे-६,५४८, कृष्णा पवार-१०,१५४, गणपत भिसे-३,६०४, गोविंद देशमुख-३,४५९,बोबडे सखाराम-१,२४६, मुस्तफा मैनोदिन शेख-१,३०२, राजाभाऊ काकडे-३,३०२, राजेंद्र अटकळ-२,८१२, विजय ठोंबरे-१,९५९, विलास तांगडे-८,८२०, विष्णुदास भोसले-१,८६०, समीर दुधगावकर-११,०५६, सय्यद अब्दुल सत्तार-२,६५०, सुभाष जावळे-३,४३४, ज्ञानेश्वर दहिभाते-३,५३९, एकूण मतदान – १३,२७,७९१, नोटा-३,३८५, अवैध मते-१५८, टेंडर मते- ३