गुलालाची उधळण : उत्कंठा अन् उत्साहात परभणीकरांची जल्लोषात मिरवणूक
बहाद्दर मतदारांच्या प्रेमापुढे नतमस्तक – परभणी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा मला संधी दिली आहे. सर्वांच्या प्रेमापुढे नतमस्तक होत, हा विजय विनम्रपणे स्वीकारतो. श्रीपांडुरंगाच्या कृपेने तुमचे नेतृत्व करण्यासाठी सर्वांच्या सेवेत नेहमीसारखाच उभा असेल. महाविकास आघाडीतील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, निष्ठावंत शिवसैनिक, बहाद्दर मतदार आणि माताभगिनींचे कोटी-कोटी आभार. – खासदार संजय (बंडू) जाधव, ( शिवसेना उद्धव ठाकरे) परभणी लोकसभा मतदारसंघ
परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्वांनी मला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य करून मला मतदान केले. त्याबद्दल सर्व जनतेचे आभार. यापुढेही आपण मला असेच सहकार्य करावे हीच विनंती. – महादेव जानकर, अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष
बाबासाहेब हेलसकर
परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवारी, चार जून रोजी सकाळी आठ वाजता सुरु झाली. या पार्श्वभूमीवर मतमोजणी सुरू झाल्यापासून केंद्राबाहेर आणि जिल्ह्यात सर्वत्र कार्यकर्त्यांसह पदाधिकारी, नेते व सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्कंठावर्धक उत्साह दिसून येत होता.
परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण ३४ उमेदवार रिंगणात होते. महाविकास आघाडीचे उमेदवार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव आणि महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यामध्ये थेट लढत झाली. फेरीगणिक खासदार जाधव यांनी निर्णायक आघाडी घेतल्यानंतर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला. सकाळपासूनच फेरीनिहाय मते, कोणीची आघाडी, कोणाला किती मते, मताधिक्य जाणून घेण्यासाठी सर्वच जण क्षणाक्षणाला उत्साहित होत होते. २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर महाविकास आघाडी व महायुतीच्या दोघाही प्रतिस्पर्धी उमेदवारांसह समर्थकांनी विजयाचे दावे, प्रतिदावे केले. सोशल मीडियावरही आकडेमोडीचा धुमाकूळ सुरू होता. अगदी निकालाच्या एक दोन दिवसाआधीही समर्थक व खुद्द उमेदवारांनी विजयाचे दावे-प्रतिदावे केल्याचे चित्र होते. परंतु सर्वसामान्य मतदारांमध्ये निकालावरून मंगळवारीही कमालीची धाकधूक व उत्कंठा शिगेला पोहोचली होती. सकाळी प्रारंभी टपाली मतमोजणीची झाली आणि अगदी पहिल्या फेरीपासून खासदार संजय जाधव यांनी आघाडी घेतली, तर महायुतीचे जानकर हे सातत्याने पिछाडीवर दिसून आले. दरम्यान, मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आकडेवारी संकलित करण्यासाठी निवडणूक विभागाचे अधिकारी, मतमोजणी अधिकारी कर्मचाऱ्यांची कमालीची धावपळ सुरू होती. सायंकाळी साडेपाचपर्यंत केवळ ११ फेर्यांचाच निकाल जाहीर करण्यात आला. मात्र मतमोजणी केंद्रात जवळपास १९ फेर्या पूर्ण झाल्या होत्या. निर्णायक ८४ हजार ३०७ मतांची आघाडी घेत जाधवांनी विजयी वाटचाल सुरू केली. अंतिम फेरीअखेर रात्री उशिरा १,३४,०६१ मतांनी विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी घोषीत केले. त्याआधीच विजय जवळपास निश्चित होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार, कॉंग्रेस व घटक पक्षातील नेते माजी आमदार विजय भांबळे, सुरेश देशमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष सुरू केला. परभणीमध्ये खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानीही महाविकास आघाडीतील नेते व पदाधिकाऱ्यांनी जाधव यांच्यावर सत्कार, शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. परभणी शहरासह जिंतूर, सेलू, पूर्णा तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजीने महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आनंदोत्सव साजरा केला.
परभणीमध्ये विजयी मिरवणूक– परभणी लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून हॅट्रीक साधल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या समर्थकांसह शिवसेना व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढली. कृषि विद्यापीठाच्या काळी कमान प्रवेशद्वारापासून गुलालाची उधळण करीत मिरवणुकीला सुरुवात झाली. महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते पदाधिकारी व हजारो समर्थक कार्यकर्ते डीजेच्या तालावर फेर धरत मिरवणुकीत सहभागी झाले होते. जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. रात्री उशिरा रेल्वे स्थानक मार्गे शहरातील प्रमुख रस्त्यांने मिरवणूक निघाली.
परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव यांचाआपण सलग तीन वेळेस विजय झाल्याबद्दल सेलू शहरातील क्रांतीचौकातील मशालीला दुधाने अभिषेक घालून व स्वच्छ धुवून काढण्यात आले. मशालीस पुष्पहार घालण्यात आला. फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला. या वेळी महाविकास आघाडीतील माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे, मनीष कदम , रघुनाथ बागल, विनोद तरटे, सभाजी पवार, शेख दिलावर, गौस लाला, परवेज सौदागर,समीर शेख, रफिख भाई खन्ना,,नरसिह हरणे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.