निम्नदुधना धरणात ११ दलघमी पाण्याची भर; पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस
सेलू जि.परभणी : पाणलोट क्षेत्रातील मंठा व परतूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सेलू् तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्न दुधना धरणामध्ये ६ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. तर एक जूनपासून ११.१३४ दलघमी पाण्याची भर पडली आहे.
पाणी योजनांसाठी धरणाच्या मृत साठ्यातून उपसा सुरू असल्याने चिंता वाढली होती. मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या सलग दोन दिवसापासून चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे दुधना नदी पात्र वाहायला लागले आहे. १७५८ क्युसेस दराने पाण्याची आवक झाली. धरण क्षेत्रात मागील २४ तासात बुधवारी सकाळी सहा वाजता ४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती प्रकल्प प्रशासनाने दिली. सोमवारी सायंकाळपासून परतूर, वाटूर, श्रेष्ठी परिसरात विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. वाटूरमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. पाणलोट क्षेत्रातील मंगळवारी पडलेला पाऊस असा : वाटूर १०५ मिमी, परतूर ६६.८८ आष्टी ११.५, श्रेष्ठी ४०.८, सातोना २३.५ मिमी.