परभणी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; सोनपेठमध्ये मुसळधार
परभणी : परभणी जिल्ह्यात रविवारी सर्वदूर दमदार पाऊस झाला. सोमवारी दुपारी परभणी शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दिवसभर वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. सायंकाळी आभाळ भरून आलेले होते. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश भागात पेरण्या, कापूस लागवडची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. सोमवारी, १७ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत मागील २४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी २८.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक ४३.४ मिलीमीटर पाऊस झाला. परभणी ३४.५, गंगाखेड ३२.७, पाथरी ३४.७, जिंतूर ११.३, पूर्णा २६, पालम २४, सेलू ३१.७, तर मानवत तालुक्यात ३०.६ मिलीमीटर पाऊस झाला.