खरीपाच्या तोंडावर रासायनिक खतांचा तुटवडा 

खरीपाच्या तोंडावर रासायनिक खतांचा तुटवडा 

आवश्यक खते उपलब्ध करून देण्याची कृषीमंत्र्यांकडे मागणी, सेलू तालुका दबाव गटाचे निवेदन

सेलू जि.परभणी : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना हव्या असलेल्या रासायनिक खतांचा जिल्हाभरात तुटवडा निर्माण झाला असून आवश्यक डीएपीसह आवश्यक ती सर्व खते शेतकऱ्यांना तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने कृषिमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

यासंदर्भात मंगळवारी, १८ जून रोजी तहसीलदारांमार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. सेलू तालुक्यासह संपूर्ण परभणी जिल्ह्यात गेल्या चार ते पाच वर्षापासून शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या डीएपी, १०:२६:३६ युरिया यासारख्या आवश्यक असलेल्या रासायनिक खतांच्या तुटवड्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त झाला आहे. संबंधित व्यापारी अथवा खतविक्रेते यांच्याकडे सदरील खतांची मागणी केली असता, खते लिंकिंगने देणे अथवा १ हजार ४०० रुपयांचे खत १ हजार ७०० रूपये असे चढ्या दराने रुपयाला विक्री केल्या जात आहे. याद्वारे सर्वसामान्य शेतकऱ्यांची लुबाडणूक व फसवणूक केली जात आहे. मात्र, या संबंधित विभागाचे कुठलेच अधिकारी हेतूत: दुर्लक्ष करत असल्याचा संशय शेतकऱ्यांना येत आहे. डीएपी आणि १०:२६:२६ या रासायनिक खताबरोबर नॅनो, नॅनो युरिया खत घेण्याची सक्ती काही व्यापारी करत आहेत. तसेच काही व्यापाऱ्यांना विचारले असता रासायनिक खते आमच्याकडे उपलब्ध नाहीत, असे उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर आवश्यक असलेल्या खतांच्या तुटवड्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झालेला आहे.

कृषी विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात नियोजन करणे अत्यंत गरजेचे असतांनाही याकडे साफ दुर्लक्ष केल्या जात आहे, असे निवेदनात म्हटले आहे.‌ निवेदनावर ॲड. श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, सतीश काकडे, इसाक पटेल, गुलाब पोळ, ॲड.दिलीप मगर, विलास रोडगे, महादेव लोंढे, परमेश्वर कादे, मुकुंद टेकाळे, रामचंद्र आघाव, लक्ष्मण प्रधान, दत्ता कांगणे, चिंतामण दौंड, योगेश सूर्यवंशी, देवराव दळवे, उमेश काष्टे, प्रमोद वीर, भारत रवंदळे मतीन दादामिया, लिंबाजी कलाल, गणेश सोळंके, विठ्ठल काळे, विलास रोडगे, नारायण पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!