सर्वदूर पावसामुळे पिकांना जीवदान; चिकलठाणा मंडळात जोरदार पाऊस
परभणी : परभणी जिल्ह्यात रविवारी दुपारी आणि रात्री पावसाने सर्वदूर हजेरी लावली. जिंतूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला, तर सेलू तालुक्यातील चिकलठाणा मंडळात अतिवृष्टी झाली. पावसामुळे लहानमोठ्या ओढ्यांना पूर आला होता. पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पिकांना जीवदान मिळाले आहे. सोमवारी सायंकाळीही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
मागील चोवीस तासांत सोमवारी सकाळी साडे दहा वाजेपर्यंत सेलू तालुक्यातील चिकलठाणा मंडळात सर्वाधिक ८३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर मोरेगाव मंडळात ३८.५, परभणी तालुक्यातील झरी मंडळात ४४.८, दैठणा ३६.३ मिलिमीटर पाऊस झाला. गंगाखेड तालुक्यातील महातपुरीमध्ये २५, जिंतूरमध्ये ५२.३, सावंगी २८.८, बामणी २९.८, बोरी ३६, आडगाव ३३.३, चारठाणा २२.३, वाघी धानोरा ३२.८, दुधगाव ३६.३, पूर्णा तालुक्यातील ताडकळसमध्ये २५.५, लिमला २८.३, चुडावा २४.३, पालममध्ये २९.५, रावराजूर ३४.३ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात सोमवारी सकाळी सरासरी २०.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोनपेठ तालुक्यात १०.७, मानवत १२.६, परभणी २०.३, गंगाखेड १६ जिंतूर ३४, पूर्णा २०.९,पालम २१.७, सेलू २८.६, पाथरी तालुक्यात सरासरी ८ मिलिमीटर पाऊस झाला.