वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी लवकरच कल्याणकारी मंडळ : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी लवकरच कल्याणकारी मंडळ : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

छत्रपती संभाजीनगर : ‘वृत्तपत्र विक्रेता हा असंघटित घटक आहे. अनेक दिवस ते कल्याणकारी मंडळाची मागणी करत आहेत. त्याचीही घोषणा लवकरच करू,’ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत नुकतेच दिले. आमदार संजय केळकर यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापण्याची मागणी केली होती.

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कामाची पद्धत, त्यासाठी लागणारा वेळ आणि त्यातून विक्रेत्यांना मिळणारे अत्यल्प उत्पन्न याचा विचार करता वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी बऱ्याच वर्षांपासून करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने गेली पंधरा वर्षे कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा सुरू आहे.कल्याणकारी मंडळाच्या मागणीसाठी तत्कालीन कामगारमंत्री हसन मुश्रीफ, संभाजी पाटील निलंगेकर, दिलीप वळसे- पाटील व विद्यमान कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला. संभाजी पाटील निलंगेकर कामगारमंत्री असताना त्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेऊन कल्याणकारी मंडळाबाबत अभ्यास समिती नेमली. समितीने अहवालही सादर केला. वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्वतंत्रकल्याणकारी मंडळ करावे, अशी शिफारस केली आहे. मात्र, त्यानंतर चार वर्षे झाली तरी अंमलबजावणी झालेली नाही. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या या मागणीचा आमदार केळकर यांच्यासह विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत आहेत.

केळकर यांनी अधिवेशनात स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ करावे, अशी मागणी केली. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र केले आहे, या घटकालाही न्याय द्यावा असा आग्रह व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार केळकर यांच्या मागणीबाबत सांगितले, ‘वृत्तपत्र विक्रेता हा असंघटित घटक आहे. ते कल्याणकारी मंडळाची मागणी अनेक वर्षांपासून करीत आहेत. केळकर हेही चार वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. वृत्तपत्र विक्रेत्यांनाही न्याय देऊ. त्यांच्या कल्याणकारी मंडळाचीही घोषणा करू.’

‘महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातून गेली १५ वर्षे पाठपुरावा करीत आहोत. आमदार संजय केळकर यांनी या वेळी मागणी मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच घोषणा करण्याचे आश्वासन दिले. ही आनंदाची व सकारात्मक बाब आहे. केळकर यांच्या माध्यमातून लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. लवकरात लवकर मंडळाची घोषणा व्हावी व अंमलबजावणी सुरू व्हावी अशी मागणी करणार आहोत,’ असे राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष अण्णासाहेब जगताप, संभाजीनगर संघटनेचे अध्यक्ष नीलेश फाटके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!