Maratha Reservation : एकजुटीची ताकद जिवंत ठेवा : मनोज जरांगे पाटील ; परभणीतील जनजागृती शांतता रॅलीला मोठी गर्दी

Maratha Reservation : एकजुटीची ताकद जिवंत ठेवा : मनोज जरांगे पाटील ; परभणीतील जनजागृती शांतता रॅलीला मोठी गर्दी

परभणी :  मराठा आरक्षणावरून सरकारने चारही बाजूने घेरण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु कितीही त्रास झाला, संकटे आली तरीही समाजाशी गद्दारी करणार नाही. मराठा समाजाला सगेसोयऱ्यांसह सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या आणि ओबीसीतूनच आरक्षणाच्या मुद्यावर आपण ठाम आहोत. तेरा जुलैच्या आत सरकारने मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिले नाही, तर राज्यातील सर्व मराठा बांधवांनी आरक्षण मिळेपर्यंत विश्वास आणि एकजुटीची ताकद जिवंत ठेवावी, असे आवाहन मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी परभणी येथे केले.

रविवारी, सात जुलै रोजी दुपारी परभणी शहरात आयोजित जनजागृती शांतता रॅलीला मराठा समाज बांधवांनी प्रचंड गर्दी केली होती. मुख्य रस्त्यावरून रॅली निघाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात जाहीर सभेत रूपांतर झाले. या वेळी संवांद साधतांना जरांगे म्हणाले, की मराठा आणि कुणबी एकच आहेत. सरकारला ५७ लाख मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. त्याच आधारे नोंदी न आढळलेल्या आणि सगेसोयऱ्यांनाही सरकारने कुणबी प्रमाणपत्र द्यावे. या मागणीपासून आपण मागे हटणार नाहीत. सरकारला १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळ तेरा तारखेनंतरच ठरवू आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे करायचे, की पाडायचे ?  छगन भुजबळ यांच्यावरही जरांगे यांनी जोरदार निशाणा साधला. गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवांच्या अंगावर कोणीही मराठ्यांनी जायचे नाही, पण मराठा समाजाला त्रास देणाऱ्या ओबीसींच्या नेत्याला निवडणुकीत सोडू नका, त्याला पाडा, असेही जरांगे यांनी यावेळी सांगितले. सर्व राजकीय पक्षातील ओबीसींचे नेते मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कामाला लागले असताना; भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्वच पक्षातील मराठा नेते, मंत्री, पदाधिकाऱ्यांनीही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी एकजूट दाखवण्याची गरज आहे, असे आवाहनही जरांगे यांनी यावेळी केले.

जागोजागी जल्लोषात स्वागत

मनोज जरांंगे पाटील यांचे रविवारी दुपारी परभणी जिल्ह्यात जागोजागी अपूर्व जल्लोषात स्वागत झाले. तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे जरांगे यांच्या स्वागतासाठी रस्त्यारस्त्यावर दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात तसेच जागोजागी लावलेले भगवे झेंडे आणि बॅनर लक्ष वेधून घेत होते. ‘लढेंगे, जितेंगे, हम सब जरांगे’, “कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, ‘ एक मराठा, लाख मराठा’, घोषणांनी परभणी शहर दणाणून गेले. स्वागताचा स्वीकार करत जरांगे यांनी उपस्थितांना अभिवादन केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!