ॲड.विष्णू ढोले यांचे सेलूमध्ये चौथ्या दिवशीही उपोषण सुरू
मुस्लिम समाजाला आरक्षणाची मागणी; अलफलाह एज्युकेशन अँड वेलफेअर संस्थेचा उपोषणास पाठिंबा
सेलू : मुस्लिम समाजाच्या विविध न्याय मागण्यांसाठी सेलू येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड.विष्णु ढोले यांनी चार जुलैपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात बेमुदत उपोषण सुरु केले आहे. रविवारी उपोषणाचा चौथा दिवस होता.
सेलू येथील अलफलाह एज्युकेशन अँड वेलफेअर संस्थेच्या वतीने रविवारी उपोषणाला पाठींबा देण्यात आला. या वेळी मौलाना तज्जुमल कास्मी, संस्थेचे अध्यक्ष अनिस कुरेशी, कार्याध्यक्ष हाजी शफिक अली खाँ, सचिव शेख महेमूद, कोषध्यक्ष निसार पठाण, उपाध्यक्ष रशीद खान, शेख शमशोद्दीन, शेख हारूण, जावेद घौरी, शेख असगर जकी यांनी उपस्थित राहून पाठींबा दिला.
ॲड.ढोले यांच्या मागण्यां याप्रमाणे : १) मुस्लिम समाजाला सर्वच क्षेत्रांमध्ये १० % आरक्षण देण्यात यावे, २) मुस्लिम समाजाला पूर्ण आरक्षण मिळेपर्यंत अंतरीमरित्या जुलै २०१४ मध्ये तत्कालीन आघाडी शासनाने अध्यादेशाद्वारे मुस्लिम समाजास दिलेले ५% आरक्षण जे शैक्षणिक क्षेत्रात माननीय उच्च न्यायालयाने मान्य केले होते ते आरक्षण पुर्नस्थापित करण्यात यावे, ३) महाज्योती, सारथी, बार्टिच्या धर्तीवर मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी मार्टिची ( मौलाना आझाद रिसर्च & ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ) या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात यावी, ४) मुस्लिम समाजाला आरक्षण मिळे पर्यंत या समाजातील विद्यार्थ्यांना उच्च व तंत्रशिक्षण तसेच वैद्यकीय व इतर व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक फीमध्ये ५०% सवलत अर्थात शिष्यवृत्ती योजना सुरु करावी, ५) मागासवर्गीय सहकारी संस्थांच्या धर्तीवर अल्पसंख्याक सहकारी संस्था स्थापन व नोंदणीसाठी कायदा करण्यात यावा, ६) प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उर्दु घर व मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक सभागृह उभारण्यात यावे, ७) न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोग, सच्चर समिती, महेमुद -ऊर्ररहेमान समिती या तिन्ही समितीने मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी.