अनोळखी क्रमांकावरून फोन : कुलगुरूंची ११ लाखांची फसवणूक

अनोळखी क्रमांकावरून फोन : कुलगुरूंची ११ लाखांची फसवणूक

अज्ञाताविरूद्ध परभणीत गुन्हा दाखल 

परभणी : फ्रॉड लिंक पाठवून बँक खात्याची माहिती घेत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्र मणी यांना १० लाख ९९ हजार रुपयांना फसविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाईल वापरकर्त्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांनी परभणीतील नवा मोंढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. कृषी विद्यापीठात ५ जुलै रोजी कुलगुरू डॉ.मणी यांना कार्यालयात कामकाज करत असताना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. संबंधिताने कुलगुरूंना तुम्हाला एक मॅसेज पाठवला असून त्यावरील लिंकमध्ये जाऊन माहिती भरा, असे सांगितले. संबंधिताने आपण बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून केवायसी अपडेट करायचे आहे, असे सांगत बँक खात्याची माहिती घेतली. तुमची ट्रान्झेक्शन लिमिट वाढवत असल्याचे सांगून बोलण्यात गुंतवून ठेवले. विचारल्याप्रमाणे कुलगुरूंनी सर्व माहिती दिली. या दरम्यान बँकेच्या दिल्ली कार्यालयातून फोन आला की; त्यांच्या बँक खात्यातून १० लाखांचे ट्रान्झेक्शन झाले आहे. त्यानंतर कुलगुरूंना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. दोन वेगवेगळ्या बँक खात्यातून १० लाख ९९ हजार रूपयांचा ऑनलाईन बँक फ्रॉड करण्यात आला. या प्रकरणी नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस निरीक्षक समाधान चवरे हे तपास करत आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!