परभणीमध्ये किसान सभेचे धरणे आंदोलन; रत्नाकर गुट्टे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी
गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी गैरमार्गाने दिवाळखोर घोषित केल्याचे प्रकरण
परभणी : गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी गैरमार्गाने दिवाळखोर घोषित केल्याप्रकरणी गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी परभणी येथील आंदोलन भूमीवर महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी, ८ जुलै रोजी शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले.
यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की; आमदार रत्नाकर माणिकराव गुट्टे यांनी गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी गैरमार्गाने दिवाळखोर घोषित केली आहे. यातून हजारो शेतकरी, ऊसतोडणी वाहतूकदार, साखर कामगार यांच्यासह अन्य व्यावसयिक देखील उध्वस्त झाले आहे. याप्रकरणी आमदार गुट्टे यांच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये ५ जुलै २०१७ रोजी शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज मंजूर करून घेवून बेकायदेशीर पणे सदर रक्कम हडप करण्यात आल्या प्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल आहे. दिल्ली येथेही केंद्रीय अन्वेषण विभागाने युको बँक व्यवस्थापनाच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आमदार रत्नाकर गुठ्ठे हे जामिनावर आहेत. या प्रकरणात ४०९.२६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोषारोप ठेवण्यात आलेला आहे. तेव्हा तातडीने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आमदार गुट्टे यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.