ॲड.ढोले यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ ‘सेलू बंद’ चे आवाहन
उपोषणकर्ते ॲड.विष्णू ढोले यांची सोमवारी सायंकाळी पाच वाजता तहसीलदार दिनेश झांपले यांनी भेट घेतली. प्रशासनास्तरावरून मागण्यांचा पाठपुरावा केला जात आहे. उपोषण थांबावावे, अशी चर्चा झाली. तर पोलिस निरक्षक दिपक बोरसे यांनीही मंगळवारी दुपारी ॲड.विष्णू ढोले यांची भेट घेतली.
सेलू जि.परभणी : मुस्लिम समाजाला सर्वच क्षेत्रांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसह मुस्लिम समाजाच्या विविध न्याय मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते ॲड.विष्णू ढोले यांनी चार जुलैपासून सेलू येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात बेमुदत उपोषण सुरु केले आहे. मंगळवारी उपोषणाचा सहावा दिवस होता. दरम्यान, ॲड.ढोले यांच्या मागण्यांची व उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नाही. उपोषणकर्त्याच्या प्रकृतीवर दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे ॲड.ढोले यांच्या मागण्यांची सकारात्मक दखल घेऊन योग्य पर्याय काढवा. यासाठी बुधवारी, १० जुलैरोजी ‘सेलू बंद’ चे आवाहन करण्यात आले. या संदर्भात सोमवारी, ८ जुलैरोजी तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर शेख साजीद, मुताहेर खान, दिलावर शेख, इरफान पटेल आदींच्या सह्या आहेत. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळेपर्यंत तत्कालीन आघाडी सरकारने अध्यादेशाद्वारे मुस्लिम समाजास दिलेले पाच टक्के आरक्षण पुर्नस्थापित करावे, महाज्योती, सारथी, बार्टिच्या धर्तीवर मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात यावी आदी मागण्यांचा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात समावेश आहे.
♦विविध संघटनांचा पाठिंबा – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, मुस्लीम युथ फोरम, अलफला एज्युकेशन सोसयटी, एमआयएम, बेलदार सेवा मंडळ, एसडीपीआय, सीपीआय, आरपीआय, शेतकरी कामगार पक्ष आदींसह विविध पक्ष, सामाजिक संघटनांनी ॲड.ढोले यांच्या बेमुदत उपोषणास पाठींबा दर्शविला आहे.