ओला हिरवा, सुका निळा : स्वच्छतेसाठी गृहभेट अभियानाला सुरूवात
परभणीमध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा उपक्रम
परभणी : ग्रामीण भागामध्ये दृश्यमान स्वच्छता निर्माण व्हावी तसेच ओला आणि सुका कचर्याचे वर्गीकरण नागरिकांनी करावे याकरिता गाव स्वच्छतेसाठी परभणी जिल्ह्यात गृहभेट अभियानाला सोमवारी (८ जुलै) परभणी तालुक्यातील जलालपुर येथून सुरुवात झाली आहे. स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विजेंद्र मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष गृहभेट अभियान राबविण्यात आले. या वेळी श्री.मुंढे यांनी महिलांशी संवाद साधून स्वच्छतेविषयक मार्गदर्शन केले. याप्रसंगी सरपंच संध्याताई संदीप टेकाळे, पोलीस पाटील बळीराम पुंजारे, मुख्याध्यापक राजेश कंठाळे, क्षमता बांधणी तज्ज्ञ वनमाला कोरडे, संवाद तज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
राज्य सरकारच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने ८ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत ‘स्वच्छतेचे दोन रंग – ओला हिरवा, सुका निळा’ अभियान राबविण्यात येत आहे. अभियान कालावधीमध्ये हागणदारीमुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे, मॉडेल झालेल्या गावामध्ये शाश्वत स्वच्छतेची लोकचळवळ निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी गावातील ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडीताई, आशाताई, बचतगटातील महिला, स्वच्छाग्रही आदी संसाधन व्यक्ती संवादक म्हणून गावातील कुटुंबांशी संवाद साधणार आहेत. शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणे, प्लास्टिक व्यवस्थापन, सुयोग्य मैला गाळ व्यवस्थापन, वैयक्तिक, सार्वजनिक शौचालयांचा वापर करणे आदी विषयावर संवाद साधल्याची माहिती सरकारने ठरवून दिलेल्या गुगल फॉर्ममध्ये ऑनलाईन करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री.मुंढे यांनी दिली.