साईबाबा बँकेच्या सभासदांना १० टक्के लाभांश : हेमंतराव आडळकर; सर्वसाधारण सभा उत्साहात

साईबाबा बँकेच्या सभासदांना १० टक्के लाभांश : हेमंतराव आडळकर; सर्वसाधारण सभा उत्साहात

ग्राहक, सभासदांची मोठी उपस्थिती, सभासदांना दहा टक्के दराने लाभांश वाटप

सकाश प्रतिनिधी, सेलू (परभणी) : बॅंका आणि अन्य वित्तिय संस्थांकडून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच सर्वच स्तरातील गुंतवणुकदारांना, ग्राहकांना आर्थिक विश्वासार्हता आणि सुरक्षिततेची हमी देणे आणि ती जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत सेलू (जि.परभणी) येथील साईबाबा बॅंकेचे संस्थापक तथा अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी व्यक्त केले. तसेच बँकेने १ कोटी ८९ लाख ९६ हजार निव्वळ नफा मिळविला असून दहा टक्के दराने सभासदांना लाभांश सभेने मंजूर केला आहे, अशी माहिती श्री.आडळकर यांनी या वेळी दिली.  

सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी, १३ जुलै रोजी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय सभागृहात उत्साहात पार पडली. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री.आडळकर बोलत होते.‌ याप्रसंगी उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, उद्योजक तथा संचालक जयप्रकाश बिहाणी, मधुकर पौळ, पवन आडळकर, प्रा.प्रभाकर रावते, मुख्यकार्यकारी अधिकारी रामराव‌ लाडाणे, डी.व्ही.मुळे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. श्री.आडळकर म्हणाले,” साईबाबा बॅंक गेल्या २८ वर्षांपासून ग्राहकांना विश्वासाची आणि सुरक्षिततेची हमी देत आली आहे. प्रतिष्ठेच्या विविध पुरस्कारांनी बँकेचा कार्यगौरव झाला आहे. गरजवंत नागरिक, व्यापारी, उद्योजक यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये बॅंकचे मोठे योगदान आहे.‌ जालना, नांदेड, हिंगोली, बीड जिल्ह्यात शाखा विस्तार होत आहे. सभासदांना दहा टक्के दराने लाभांश, कर्मचाऱ्यांना बोनस, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, ग्राहकांना सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त व्यवहार सेवासुविधा बॅंकेने उपलब्ध करून वेगळी ओळख निर्माण केली आहे. तज्ज्ञ संचालक, अनुभवी अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि सभासदांच्या पाठबळावर बॅंकेची प्रगतीकडे निरंतर वाटचाल सुरू आहे.” यावेळी कांचन कोरडे, ॲड.गोविंदराव शेळके, सर्जेराव लहाने, प्रा.रावते, बळिराम माने यांनी मनोगत व्यक्त केले. विविध शाखेतील नियमित परतफेड करणाऱ्या कर्जदारांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

२०२३-२४ या आर्थिक वर्षात बँकेने १ कोटी ८९ लाख ९६ हजार निव्वळ नफा मिळविला. कायदेशीर तरतूदी वजा जाता, संचालक मंडळाने सुचविलेला दहा टक्के लाभांश सभेने मंजूर केला. मागील आर्थिक वर्षात बॅंकेला ऑडिट-अ वर्ग प्राप्त झाला. संपलेल्या आर्थिक वर्षात बँककडे भाग भांडवलं ६ कोटी २ लाख रूपये आहे, स्वनिधी २१ कोटी आहे. एकूण ठेवी २१० कोटी ६८ लाख रूपये आहेत. कर्ज वाटप १२० कोटी आहे. नेट एनपीए शून्य टक्के असून ग्रॉस एनपीए ६.२३ टक्के आहे. एकूण सभासद ८ हजार ८९६ आहेत. सर्व शाखा नफ्यात आहेत. गेल्या दहा वर्षा पासून १० टक्के दराने लाभांश वाटप करीत आहोत.

सतत दहा वर्षापासून बँको पुरस्कार, महाराष्ट्र स्टेट को.ऑप असोसिएशनचा पद्मभूषण कै वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार, बेस्ट चेअरमन पुरस्काराने बॅंकेच्या कार्याच्या गौरव झाला आहे. ग्राहकांनी एटीएम, पीओएस, इ-कॉम, मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड अशा आधुनिक तंत्रज्ञान व सुविधांचा वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रास्ताविक रामराव लाडाणे यांनी केले. अहवाल वाचन सुभाष चव्हाण, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. निसार पठाण यांनी आभार मानले. सभेला सभासद, ग्राहक, ठेवीदार आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सभेच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक दत्ता पौळ, संतोष हुगे, अविनाश आडळकर, शेख अबूजर यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!