No Education Fee-No Exam Fee : ‘ती’ गेली, पण हजारो मुलींच्या ओठी ‘तिचे’ नाव

No Education Fee-No Exam Fee : ‘ती’ गेली, पण हजारो मुलींच्या ओठी ‘तिचे’ नाव

मुलींना मोफत शिक्षणाचा राज्य सरकारचा निर्णय, परंतु ‘पूनम’च्या कुटुंबीयांची परवड थांबेना, ना रेशनकार्डवर नावे; ना घरकुल शक्य

पूनमच्या आत्महत्येने सरकारला पाझर फुटला. राज्यातील हजारो मुलीचे शिक्षण मोफत झाले. पण  मृत ‘पूनम’च्या आदीवासी कुटुंबीयांची परवड थांबलेली नाही. अनेकांच्या प्रयत्नांनंतर धर्मा पवार यांच्या मुलाच्या नावे रेशनकार्ड मिळाले पण, त्यावर पूनमच्या आईवडीलांची नावे नाहीत. त्यामुळे मोफत धान्यांचा लाभ जूनमध्ये केवळ मुलालाच मिळाला.  मिळाला. शिवाय पवार कुटुंबियांना आजही मेहुण्याने दिलेल्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये राहावे लागते. या भागात सरकारची घरकुल योजना मंजूर होत नाही.‌ त्यामुळे विशेषबाब म्हणून पंतप्रधान घरकुल अथवा राज्य सरकारच्या अन्य सामाजिक न्याय योजनेंतर्गत धर्मा पवार यांना घरकुल मंजूर करण्यात यावे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने यासाठी योग्य ते प्रयत्न करणे गरजेचे आहे. – आकाश काळे, पूनमचे मामा, सेलू

शैक्षणिक फीसाठी पैसे नसल्याने सेलू (जि.परभणी) येथील पूनम धर्मा पवार या आदीवासी विद्यार्थिनीने पाच महिन्यांपूर्वी राहत्या घरी गळफास आवळून आपले जीवन संपविले. तिला खूप शिकायचे होते. पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तीने जगाचा कायमचा निरोप घेतला. पूनमच्या आत्महत्येने व्यथित झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच वेळी राज्यभरातील मुलींसाठी मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. तो आता लागू झाला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो मुलींना आता शंभर टक्के फी माफ होणार आहे. ‘ती’ गेली,पण हजारो मुलींच्या ओठी ‘पूनम’चे नाव कायम राहणार, हे निश्चित.
सेलू येथील मूळ रहिवासी असलेल्या पण मोलमजुरीसाठी पंजाबमध्ये स्थायिक झालेल्या धर्मा कठाळू पवार यांचे कुटुंब लॉकडाऊनमध्ये सेलूला आले. पत्नी रेखाचा भाऊ आकाश काळे यांच्या गायत्रीनगरला लोखंडी पत्र्याच्या खोलीत २०१९ मध्ये त्यांनी संसार थाटला. कसेबसे मोठी मुलगी ज्योती हिचे लग्न त्यांनी उरकल. तीही मोलमजुरी करते. मुलगा महेश डीएडचे शिक्षण घेत आहे. तिसऱ्या क्रमांकची मुलगी पूनम धर्मा पवार इयत्ता १२ वीमध्ये शिक्षण घेत होती. पूनमला पोलिस प्रशासनात अधिकारी व्हायचे होते ती खूप अभ्यास करायची. काही दिवस तिने अकॅडमीदेखील जॉईन केली. वडील धर्मा पवार वेअर हाऊसमध्ये हमालीचे काम करतात आई मोलमजुरी करून हातभार लावते. कुटुंबातील अठराविश्वे दारिद्रयाची चिंता पूनमला सतावत होती. याच विवंचनेतून पूनमने ५ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार पुढे आला. यावेळी पोलिसांना पूनमने मृत्युपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी मिळाली. “शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून मी आत्महत्या करीत आहे”,असे त्यात लिहिलेले होते.
योजनेला ‘पूनम’ चे नाव हवे
आदिवासी कुटुंबांतील पूनम धर्मा पवार या विद्यार्थिनीच्या आत्महत्येने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यथित झाले. याची दखल घेत मुलीच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण माफ करण्याचा निर्णय घ्यायचा असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगितले. ८ फेब्रुवारीला जळगावला एका कार्यक्रमात मुलींना मोफत शिक्षणाची घोषणा झाली. पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात संपूर्ण राज्यभरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ओबीसी मुलींसाठी मोफत शिक्षण देण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. ज्या मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मुलींना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग. कृषि, पशुसवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणार्‍या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के लाभा ऐवजी १०० टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सरकारने मान्यता बहाल केली आहे. त्यासाठी ९०६.०५ कोटी रुपये एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास मंजुरी देण्यात आली आहे. पण, ज्या पूनमच्या बलिदानाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील हजारो मुलींचे शिक्षण मोफत झाले. त्यामुळे या योजनेला किमान ‘पूनम’चे नाव देऊन सरकारने कृतज्ञता व्यक्त करावी. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही यासाठी प्राधान्याने पुढाकार घ्यावा, अशी मागणी सेलूतील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातून होत आहे.
…तरच घरकुल मंजूर करणे शक्य-सेलू येथील गायत्रीनगर वसाहतीची जागा सरकारच्या मालकीची आहे. पंतप्रधान घरकुल योजनेतून घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्यांना स्वतःच्या मालकीची जागा असणे आवश्यक आहे. त्यामुळे शासकीय स्तरावरून जागा हस्तांतरणाचा निर्णय होणे गरजेचे आहे. त्यानंतरच मृत पूनमचे वडील धर्मा पवार यांना घरकुल मंजूर करणे शक्य आहे. – जी.बी.जोशी, नगर कनिष्ठ अभियंता, नगरपालिका, सेलू

वार्तांकन – बाबासाहेब हेलसकर

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!