राजवाडीच्या शाळेतील गुणवंतांचा सत्कार
सेलू : सेलू तालुक्यातील राजवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय समितीची बैठक शनिवारी, १३ जुलै रोजी उत्साहात पार पडली. यानिमित्ताने विद्यार्थी संस्कार ज्युनिअर आयएएस स्पर्धा परीक्षेसह विविध परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजय चिकटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरख काष्टे, शिवहरी शेवाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी ज्युनिअर आयएएस स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या स्वरा काष्टे या विद्यार्थिनीचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तर श्रुती गायकवाड, शिवम मुंजाभाऊ बणगे, जिशान गफार पठाण, संस्कृती दिलीप काष्टे, सालिया नियामतखान पठाण या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका स्वाती हेलसकर यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी श्री.चिकटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन धनश्री आगळे यांनी केले. रेशमा सुकळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला चंद्रशेखर काष्टे, गुलशर पठाण, गफार पठाण, शितल बनगे, दादाराव गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य, माता पालक आदींची उपस्थिती होती.