श्रवण भक्तीचा आदर्श म्हणजे श्रीमद् भागवत कथा : नंदकुमार गोंदीकर महाराज
फुलारी गल्लीतील श्रीदत्त मंदिरात कथेचे आयोजन, श्रोत्यांची मोठी उपस्थिती
सेलू : ग्रंथ तर पुष्कळ आहेत परंतु प्रेम वृद्धिंगत करणारा व भक्ती पुष्ठ करणारा कोणता ग्रंथ असेल तर तो श्रीमद भागवत ग्रंथ आहे. श्रवण भक्तीचा आदर्श म्हणजे भागवत आहे, असे मत प्रसिद्ध भागवताचार्य नंदकुमार महाराज गोंदीकर यांनी भागवत कथेच्या निरुपणात बोलतांना व्यक्त केले. नंदकुमार महाराज गोंदीकर यांच्या शिष्य परिवार व भाविक भक्तांच्या सहकार्यामधून गुरू पोर्णिमेचे औचित्य साधून या श्रीमद भागवत कथेचे आयोजन १४ ते २१ जुलै कालावधीत फुलारी गल्लीतील श्रीदत्त मंदिरामध्ये करण्यात आले आहे.
भागवताचार्य नंदकुमार महाराज यांच्या सुश्राव्य व अमृततुल्य अशा रसाळवाणी मधून दुपारी १ ते ४ यावेळेत कथा निरूपण होणार आहे .या वेळी बोलतांना गोंदीकर महाराज पुढे म्हणाले की; भगवंताच्या जागृत अवस्थेत भगवत मुखातून प्रगट झालेला ग्रंथ म्हणजे भागवत ग्रंथ आहे. अंतःकरणातील जन्ममरणाच्या गाठीतून मुक्त करणारा हा ग्रंथ आहे. भागवत हा केवळ ग्रंथ नसुन साक्षात भगवंतच आहे. भागवत हे अठरावे महापुराण आहे. श्रवण भक्तीचा आदर्श म्हणजे भागवत आहे. यामध्ये श्री राम जन्म, श्री नृसिंह जन्म, श्री कृष्ण जन्म या सारख्या विविध धार्मिक कथा निरूपण होणार आहेत. दि १४ जुलै रोजी या भागवत कथेचा प्रारंभ झाला. त्यानिमित्त नंदकुमार महाराज व भागवत कथेची शोभायात्रा १४ जुलै रोजी सकाळी शेरे गल्लीतील श्री जगदंबा देवी मंदिर ते महाराजांची निवास व्यवस्था असलेल्या जयंतराव दिग्रसकर यांच्या घरापर्यंत काढण्यात आली होती. दुपारी १ वाजता रमाकांत चौधरी व शीतल चौधरी यांच्या हस्ते सर्व स्थापीत देवता व विधिवत ग्रंथ पूजन करण्यात आले .यावेळी केशव दिक्षित यांनी पौरोहित्य केले. २० जुलै, शनिवार रोजी भागवत ग्रंथाची समाप्ती होणार असून माजी जिल्हा परिषद सभापती अशोकराव काकडे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा व महाआरती होणार आहे. २१ जुलै रोजी व्यास पोर्णिमेनिमित सर्व शिष्य परिवाराच्या वतीने भागवताचार्य नंदकुमार महाराज गोंदीकर यांचे गुरुपूजन कार्यक्रम होणार असून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी भागवत कथा श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.