आषाढी एकादशी : रोडगे प्रिन्स इंग्लिश शाळेत दिंडी सोहळा उत्साहात; श्रीराम प्रतिष्ठानचा उपक्रम
सेलू जि.परभणी : सेलू् येथील एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त मंगळवारी, १६ जुलै रोजी आषाढी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, प्राध्यापक महादेव साबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ.रोडगे म्हणाले यांनी वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी घातला. त्याला संत एकनाथांनी भक्कम आधार दिला आणि संत तुकाराम महाराजांनी त्याचा कळस रचला, असे मत व्यक्त करून संत परंपरेवर भाषणातून प्रकाश टाकला. दिंडी सोहळ्यात पाचवी व सहावीच्या मुलामुलींनी वारकऱ्यांची तसेच श्री विठ्ठल रखुमाईची वेशभूषा साकारली. श्री विठ्ठलाची भक्ती गीते, भारुड, अभंग, गवळण, फुगडी लोकनृत्य व पावली सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रतिष्ठानच्या कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.