Drawing Examination 2024 : चित्रकला ग्रेड परीक्षा २५ सप्टेंबरपासून
कला शिक्षण मंडळाच्या नियंत्रणात पहिल्यांदाच या परीक्षा होणार आहे.
वेळापत्रक याप्रमाणे : केंद्राची नोंदणी अद्ययावत करणे : १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट, शाळांची नोंदणी प्रक्रिया : १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट, विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी : ५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट
परभणी : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळातर्फे एलिमेंटरी, इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया पाच ऑगस्टपासून सुरू होत आहे. ३१ ऑगस्टपर्यंत परीक्षेसाठी नोंदणी करता येणार आहे. कला शिक्षण मंडळाच्या नियंत्रणात पहिल्यांदाच या परीक्षा होणार आहे.
कला पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठी राज्यात कला शिक्षण मंडळ स्थापन करण्यात आले. यापूर्वी कला संचालनालयातर्फे एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षा घेण्यात येत होती. परीक्षा २५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान घेतली जाणार आहे. यामध्ये २५ व २६ सप्टेंबर दरम्यान एलिमेंटरी तर २७ व २८ सप्टेंबर रोजी इंटरमिजिएट होणार आहे. एलिमेंटरीमध्ये चार तर इंटरमिजिएट परीक्षेतही विषयाचे पेपर असतात. ऑनलाइन पद्धतीने करावयाची नोंदणी व संबंधित माहिती https://www.msbae.org.in या वेबसाइटवर उपलब्ध असल्याचे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
परीक्षेसाठी १,१३० केंद्र
महाराष्ट्रासह छत्तीसगड, गोवा, उत्तराखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यातील विविध केंद्रावरुन ही परीक्षा घेण्यात येते. सुमारे ११३० केंद्रावरुन ही परीक्षा घेण्यात येते. बारा हजारांपेक्षा अधिक शाळांमधील सुमारे आठ लाख विद्यार्थी एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड अशा दोन्ही परीक्षेला नोंदणी करतात, असे शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे यांनी कळविले आहे.