आयुक्त सांडभोर यांची तात्काळ बदली करा
परभणी शिवसेना महिला आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
परभणी : परभणी महापालिकेच्या आयुक्त तृप्ती सांडभोर यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्या तथा माजी विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे यांनी एका शिष्टमंडळाद्वारे शुक्रवारी (१९ जुलै ) जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले. परभणी शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून नागरिकांना पाठदुखी व मणक्याचे आजार होऊ लागले आहेत. महापालिकेची नालेसफाई नियमितपणे होत नसल्याने जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कचरा संकलित करणाऱ्या घंटागाड्याही नियमित येत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेचे प्रशासन पूर्णपणे ढेपाळले असून सध्या त्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही असे यावेळी शिष्टमंडळातील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
महापालिकेच्या आयुक्तांच्या कारभाराविषयी सातत्याने आवाज उठवूनही कोणतीच कार्यवाही होत नाही. उलट महापालिकेने वाढवलेले उपकर व शास्ती यांची वाढीव भर जनतेच्या माथी बसली आहे. राजकीय वरदहस्तामुळे श्रीमती सांडभोर या टिकून आहेत, एवढेच नव्हे तर त्यांना पदोन्नतीही देण्यात आली आहे. अकार्यक्षम अधिकाऱ्यास सरकारने पदोन्नती देणे ही बाब परभणीकरांवर अन्याय करणारी असून श्रीमती सांडभोर यांची तात्काळ बदली करण्यात यावी व परभणीकरावरील अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी यावेळी महिलांनी निवेदनाद्वारे केली
आयुक्तांची बदली लवकर केली नाही, तर शिवसेना उग्र आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे. या वेळी अंबिका डहाळे यांच्यासह वंदना कदम, कविता नंदुरे, वैशाली खांडे, कांचन राठोड, रेखा बोखारे, सुनीता कांबळे, संगीता टेहरे, स्वाती मोरे आदींसह महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थिती होत्या.