Microsoft : मायक्रोसॉफ्टची प्रणाली बंद पडल्याने जगभरातील दैनंदिन व्यवहार ठप्प

Microsoft : मायक्रोसॉफ्टची प्रणाली बंद पडल्याने जगभरातील दैनंदिन व्यवहार ठप्प

वृत्तसंस्था,नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट विंडोज प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवारी जगभरात शुक्रवारी हलकल्लोळ उडाला. त्यामुळे हवाई सेवा, बँकिंगसह अन्य क्षेत्रांतील व्यवहार ठप्प झाले. भारतात हवाई सेवेला सर्वाधिक फटका बसला असून, शेकडो विमानोड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. भारतासह जगभरात मायक्रोसॉफ्टवर अवलंबून असलेल्या कंपन्यांचे कार्यालयीन कामकाज विस्कळित झाल्याने त्यांना मोठा फटका बसला. मायक्रोसॉफ्ट विंडोजमधील बिघाडामुळे शुक्रवारी सकाळी कम्युटरच्या स्क्रीनवर ‘ब्ल्यू स्क्रीन डेथ’चा संदेश झळकू लागला आणि जगभरातील वापरकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला. सेवा विस्कळित झाल्याची कबुली देऊन ‘मायक्रोसॉफ्ट ३६५३ने ‘एक्स’वर पोस्ट केली. अमेरिका, भारतासह जगभरातील अनेक देशांना मायक्रोसॉफ्ट प्रणालीतील बिघाडाचा फटका बसला. हवाई सेवेला सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे भारतासह जगातील अनेक देशांतील विमानतळांवर गोंधळ उडाला. भारतात ‘इंडिगो’ला सर्वाधिक फटका बसला. ‘इंडिगो’ची सुमारे २०० विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. शिवाय, शेकडो उड्डाणे विलंबाने झाली.

ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’ ही मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि रिअॅक्टओएस ऑपरेटिंग सिस्टिमवर दर्शवली जाणारी महत्त्वपूर्ण आणि गंभीर त्रुटी आहे. ऑपरेटिंग सिस्टिम सुरक्षितपणे काम करणे अशक्य होते, अशा परिस्थितीत सिस्टिम कोलमडल्याचे या स्क्रीनद्वारे दर्शवले जाते. या त्रुटीला ‘ब्लू स्क्रीन एरर’, ‘ब्लॅक स्क्रीन एरर’ किंवा ‘स्टॉप कोड एरर’ असेही म्हटले जाते. विंडोजला अनपेक्षितपणे बंद किंवा रिस्टार्ट करावे लागले की, हा एरर उद्भवतो. ‘तुमच्या कम्प्युटरचे नुकसान टाळण्यासाठी विंडोज शटडाऊन करण्यात आले आहे’ अशा अर्थाचा संदेश दर्शवला जाऊ शकतो.

उड्डाणांना फटका अमेरिका आणि युरोपातील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा कालावधी सुरू असतानाच, विमानतळावरील चेक-इन तसेच बुकिंग सुविधा कोलमडल्या. त्यामुळे विमानतळांवर मोठ्या रांगा लागल्या. ऑस्ट्रेलिया तसेच आशियातही काही ठिकाणी असाच गोंधळ उडाला.मायक्रोसॉफ्टच्या प्रणालीत बिघाड झाल्यामुळे, बेंगळुरू विमानतळावर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या.

चुकीच्या अपडेटचा फटका मायक्रोसॉफ्टला तंत्रसुरक्षा पुरविणाऱ्या ‘क्राऊडस्ट्राईक’ या कंपनीने चुकीचे अपडेट केल्याने ही प्रणाली ठप्प झाल्याचे स्पष्ट झाले. सायबरसुरक्षा भेदली गेल्याने किंवा सायबरहल्ल्यामुळे हा बिघाड झालेला नसून, चुकीचे अपडेट त्यास कारणीभूत आहे, असे ‘क्राऊडस्ट्राइक’ या सायबर सुरक्षा कंपनीने स्पष्ट केले. या घटनेमुळे मायक्रोसॉफ्ट क्लाऊड आधारित सेवेवरील सर्व कामकाज ठप्प झाले. हवाई सेवेसह वित्तीय सेवा, ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटना मोठा फटका बसल्याचे इंटरनेट सेवेची पडताळणी करणाऱ्या ‘डाऊन डिटेक्टर’ने नोंदवले.

अर्थव्यवहार थंडावले जगभरातील अनेक देशांमध्ये आर्थिक व्यवहार थंडावले. दक्षिण आफ्रिकेतील किमान एका बँकेला मायक्रोसॉफ्टच्या गोंधळाचा फटका बसला. न्यूझीलंडमध्येही काही बँकांचे कामकाज थांबल्याचे सांगण्यात आले. ब्रिटनमध्ये रेल्वेखोळंबा मायक्रोसॉफ्टमधील बिघाडामुळे ब्रिटनमध्ये रेल्वेसेवेला काही अंशी फटका बसला. या समस्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे येथील नॅशनल रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले.

सायबर हल्ला नसल्याचे स्पष्टीकरण मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या सुरक्षेसाठी फाल्कन अॅन्टीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर हा बिघाड झाल्याचे ‘क्राऊडस्टाइक’ या सायबर सुरक्षा कंपनीने मान्य केले. सायबर सुरक्षा भेदली गेल्याने किंवा सायबरहल्ल्यामुळे हा बिघाड झालेला नसून, मायक्रोसॉफ्ट विंडोज प्रणालीतील चुकीच्या अपडेटमुळे सेवा कोलमडल्याचे ‘क्राऊडस्टाइक’ या सायबरसुरक्षा कंपनीने स्पष्ट केले. नेमका दोष कळला असून, तो दूर करण्यात आला आहे, असेही कंपनीने स्पष्ट केले. त्यानंतर भांडवली बाजारात ‘क्राऊडस्टाइक’चे समभाग कोसळले.

रुग्णालयांवरही परिणाम ऑस्ट्रेलियात वृत्तवाहिन्यांचे प्रसारण अचानक थांबले. रेडिओचे कामकाजही थांबले. ब्रिटन; तसेच जर्मनीमध्ये रुग्णालयांच्या कामकाजाला फटका बसला. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस अंतर्गत वैद्यकीय नोंदी आणि वेळापत्रकाची नोंद करणाऱ्या कम्प्युटर सेवेला फटका बसला.


Credit – Mata

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!