मायक्रोसॉफ्ट : प्रणालीतील बिघाडाचा भारताला फारसा फटका नाही; शेअर बाजार सुरळीत
वृत्तसंस्था, मुंबई : मायक्रोसॉफ्टच्या प्रणालीत ‘ब्ल्यू स्क्रीन ऑफ डेथ’ या शुक्रवारी अचानक निर्माण झालेल्या जागतिक गोंधळाचा फटका देशातील बहुतांश वित्तव्यवस्थांना बसलेला नाही. केवळ १० बँका व बिगरबँक वित्तसंस्थांना याचा फटका बसला आहे. मात्र, यावर तोडगा निघालेला आहे किंवा या दोषाचे निराकरणही करण्यात आले आहे.
मायक्रोसॉफ्टच्या मुख्य प्रणालीत अचानक शुक्रवारी सकाळपासून दोष निर्माण झाला. त्यामुळे अनेक विमानांची उड्डाणे विस्कळित झाली. जगभरात अनेक बँकांचे कामकाज बंद पडले. काही देशांत शेअर बाजारालाही याचा फटका बसला. याशिवाय प्रसारमाध्यमांचे दैनंदिन कामकाज अनियमित होऊ लागले. ब्ल्यू स्क्रीन ऑफ डेथचा फटका मायक्रोसॉफ्ट-३६५ या प्रणालीचा अंगीकार करणाऱ्या प्रत्येक घटकाला बसला. ‘क्राउडस्ट्राइक’ या सायबर सुरक्षा संस्थेने प्रणाली अद्ययावत करण्यासाठी केलेला प्रयत्न या गोंधळासाठी कारणीभूत ठरला. यामुळे विंडोज आधारित डेस्कटॉप व लॅपटॉप यांच्यावर परिणाम झाला. या संगणकांच्या अंतर्गत प्रणाली बंद पडल्या. बँकांच्या महत्त्वाच्या प्रणाली क्लाऊडवर नाहीत. त्याचप्रमाणे काही बँकांच ‘क्राउडस्ट्राइक’ टूल वापरतआहेत. आमच्या निरीक्षणानुसार बँका आणि बिगरबँक वित्तसंस्था (एनबीएफसी) मिळून १० वित्तसंस्थांनाच या गोंधळचा फटका बसला आहे, असे रिझर्व बॅंकेने निवेदनात सांगितले आहे, दरम्यान, राष्ट्रीय आणि मुंबई या दोन्ही शेअर बाजारांचे कामकाज शुक्रवारी सुरळीत सुरू राहिले. मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये ‘ब्लू- स्क्रिन ऑफ डेथ’ संदेश घोटाळा झाल्यामुळे जगभरातील संगणकीय प्रणाली धोक्यात येऊन काही शेअर बाजार बंद पडले होते. मात्र या दोन्ही शेअर बाजारांच्या कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही.
Credit- Mata