बालवाचकांच्या साहित्य संमेलनाला परभणीमध्ये मोठा प्रतिसाद
अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राने पहिल्यांदाच राबिवला उपक्रम
परभणी : शहरातील शिवाजी नगरात मराठवाडा हायस्कूलमध्ये रविवारी, २१ जुलै रोजी बालवाचक साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले. अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राने पहिल्यांदाच राबविलेल्या या संमेलनाला जिल्हाभरातील बालवाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमान अनुराधा चव्हाण, तर उद्घाटकचा मान प्रियंका यादव या विद्यार्थिंनीला मिळाला. बालकांमधील साहित्य गुणाला या संमेलनामुळे संधी मिळाली. बालवाचकांनी खूप वाचन करावं, निरीक्षण व कल्पनाशक्तीच्या समन्वयातून कविता, गोष्टीची निर्मिती करावी असा संदेश या संमेलनातून मार्गदर्शकांनी दिला.
अगदी सत्तर ऐंशी किलोमीटर अंतराहून बालवाचक पेन, वही, पाणी बॉटल, जेवणाचा डब्बा पुस्तके वाचून नोंदी केलेल्या वह्या घेऊन सकाळी दहा वाजता संमेलन ठिकाणी हजर झाले. रविवार असताना सुद्धा बालवाचक, त्यांना मार्गदर्शन करणारे समन्वयक शिक्षक, पालक, मार्गदर्शक यांनी वेळ काढला.
स्वरचित बालवाचक कवींचे संमेलन, कथाकथन, नाटक, गटचर्चा या सर्व सत्रात बालवाचकांनी स्वयंपूर्ण सहभाग नोंदविला. बालवाचकांच्या साहित्यिक प्रतिभेला बालवाचकांनीच भरभरून दाद दिली. जिल्हास्तरीय फेरीतून निवडलेल्या उत्कृष्ट बालवाचकांचा सन्मान करण्यात आला. शिक्षणाधिकारी संजय ससाणे, प्राचार्य डॉ. विकास सलगर, आनंद पांडे, अरविंद सगर, त्रिंबक वडस्कर यांनी मार्गदर्शन केले. संमेलनाध्यक्षा अनुराधा चव्हाण, उद्घाटक प्रियंका यादव यांनी मनोगत व्यक्त केले. या संमेलनात जिल्हाभरातून आलेले बालवाचक, त्यांचे पालक, समन्वयक शिक्षक, मार्गदर्शक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रास्ताविक अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे यांनी केले. सूत्रसंचालन कवयित्री इंदुमती कदम तर आभार प्रदर्शन जिल्हा समन्वय प्रकाश डुबे यांनी केले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी दिपाली महिंद्रकर, रत्नमाला शेळके, सुलोचना गिरी, मंजुषा देशमुख, सुषमा नवले, वैशाली धाबे, माधुरी खंडागळे, श्रीमती स्वामी, मनीषा जोशी, श्रीमती काळे, कैलास सुरवसे, नरहरी मुटकुळे, रविकांत झटे, ईश्वर मोरताळे, अनंता कदम, गजानन कुरे यांनी परिश्रम घेतले.