क्रीडा संकुलाच्या कामास गती द्यावी; निधी कमी पडणार नाही : आमदार मेघना बोर्डीकर
सेलू, जिंतूर तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक
सेलू : सेलू व जिंतूर तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक २३ जुलै रोजी समितीच्या अध्यक्षा आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिंतूर तहसील कार्यालय येथे बैठक संपन्न झाली. याप्रसंगी जिंतूरचे तहसीलदार राजेश सरवदे, सेलूचे तहसीलदार दिनेश झांपले, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, तालुका क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने सेलू तालुका क्रीडा संकुलाचे काम निविदेप्रमाणे त्वरीत सुरू करावे, असे आमदार बोर्डीकर यांनी सांगितले. सरकारच्या वतीने मंजूर झालेला निधी बांधकाम विभागास वर्ग करण्यात येईल, असे तालुका क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी सेलू यांनी यावेळी स्पष्ट केले. तर दोन महिन्यात काम पूर्ण करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नांवदे यांनी सांगितले. जिंतूर तालुका क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे बांधकाम १५ ऑगस्ट २०२४ पर्यत पूर्ण करावे, असे आमदार बोर्डीकर यांनी सांगितले. तर सदरील कामाचा निधी सां.बा.विभाग परभणी यांना पूर्ण वर्ग केला असल्याची माहिती कविता नांवदे यांनी बैठकीत दिली. बैठकीला क्रीडा अधिकारी रोहन औढेकर, सुयश नाटेकर, गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत , राजेश मारेवार, उपअभियंता बळीराम माने, एस.बी.दाभाडे, उपनिरीक्षक डी.सी.दाभाडे, तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे, क्रीडा मार्गदर्शक शेख शाहरुख, प्राध्यापक गणराज गायकवाड उपस्थित होते.